धनगर समाज आरक्षण (Dhangar Reservation) मुद्दावर आक्रमक झाला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या आक्रमकतेचा सोलापूर येथे सामना करावा लागला. धनगर आरक्षण कृती समितीने (Dhangar Reservation Action Committee) विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळत प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावावा ही मागणी केली. सोलापूर (Solapur News) येथील विश्रामगृहात हा प्रकार घडला. धनगर आरक्षण हा मुद्दा पाठीमागील अनेक वर्षे प्रलंबित आहे. असे असतानाही राज्य सरकारचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलकांनी भंडारा उधळला.
राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसांसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर थांबले होते. या वेळी काही लोक त्यांच्या भेटीसाठी अचानक आले. ते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या समोर आपले म्हणने मांडत होते. निवेदनही स्वीकारत होते. त्याच वेळी अचानक काही कार्यकर्त्यांनी खिशालील भंडाऱ्याची पुडी काढली आणि येळकोट येळकोट म्हणत त्यांच्यावर भंडारा उधळला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. तसेच, मंत्री विखेपाटील यांच्या सुरक्षेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही धावपळ उडाली. अर्थात, पोलिसांनी तातडीने हालचाल करत विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला घेतले. त्यानंतर त्यांना ताब्यातही घेतले. दरम्यान, कार्यकर्त्यांना या वेळी मारहाण झाल्याचे समजते.
व्हिडिओ
प्रसारमाध्यमांशी बोलताना धनगर समाज आरक्षण कृती समिती कार्यकर्त्यांनी सांगितले की, पाठीमागील अनेक वर्षांपासून सरकार केवळ आणि केवळ अश्वासनेच देत आहे. त्यापलीकडे काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे समाजाच्या मनात अतिशय संतप्त भावना आहे. परिणामी आम्ही आमचे म्हणने भंडारा उधळून मंत्र्यांपर्यंत पोहोचवले आहे.