Dhananjay Munde on Raj Thackeray:  ‘अर्धवटराव’,  ‘तात्या विंचू’ यांवरुन मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 'ओम फट स्वाहा'
Dhananjay Munde on Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्ला चढवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आक्रमक झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सुरु आहे. या टीकेत प्राणी, पक्षी यांच्यासोबतच आता चित्रपटांतील पात्रांचाही उल्लेख होऊ लागला आहे. राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख 'जॉनी लिव्हर' असा केला. त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही सांगली येथील सभेत राज ठाकरे यांचा उल्लेख 'अर्धवटराव' असा केला. त्याला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. मनसेच्या (MNS) चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मुंडे यांना उद्देशून म्हटले आहे की, ' तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा' (Om Fat Swaha) करतील.

धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, रामदास पाध्ये पूर्वी बोलक्या बाहुल्यांचा खेळ करत असत. तो प्रसिद्ध खेळ होता. आताही भाजपकडून बोलक्या बाहुल्यांचाच खेळ सुरु आहे. या बाहुल्यांमधील 'अर्धवटराव' पुर्वी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात बोलायचे. 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत सीडी लावायचे. आता एकदा सीडी घुसली आणि अर्धवटराव थेट गप्पच बसले. आता कुठे आहे रे ती सीडी असे म्हणत आहे, अशी टोलेबाजी धनंजय मुंडे यांनी केली होती. सांगली येथील इस्लामपूर येथील सभेत धनंजय मुंडे बोलत होते.भाजपचे भोंगे म्हणून राज ठाकरे काम करत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Dilip Walse Patil on Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर गृहविभाग सतर्क, दिलीप वळसे पाटील म्हणाले 'आम्ही पूर्ण तयारीत')

दरम्यान, मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही ज्यांची ‘अर्धवटराव’ म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या ‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार आहेत. राजसाहेबांनी दे दणादण करायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे, लवकरच तुमचा थरथराट होणार. Get Well Soon धनंजय मुंडे', असेही खोपकर यांनी म्हटले आहे.