Dilip Walse Patil on Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या अल्टीमेटम नंतर गृहविभाग सतर्क, दिलीप वळसे पाटील म्हणाले 'आम्ही पूर्ण तयारीत'
Dilip Walse Patil, Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मशिदींवरील भोंगे हटवावेत यासाठी मनसे (MNS) आणि भाजप आक्रमक आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तर थेट राज्य सरकारला अल्टीमेटमच दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा गृहविभाग सतर्क झाला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी कालच (रविवार, 18 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था यांबाबत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन येत्या एक दोन दिवसांमध्ये एक सविस्तर मार्गदर्शक सूचना प्रसृत केल्या जातील. राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी आपण पूर्ण तयारीत असल्याचेही त्यांनी म्हटले.

राज्य सरकार म्हणून कोणताही निर्मण घेत असताना सर्वांगिन विचार करावा लागतो. घेतलेल्या निर्णयाचे भविष्यात काय परिणाम होतील. त्याचे फायदे, तोटे कितपत असतील यांबाबतही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एकदा पोलीस महासंचालकांसोबत, आयुक्त स्तरावर बैठक होईल. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली आहे. ते आज (सोमवार, 19 एप्रिल) सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

परिस्थिती बिघडू नये यासाठी आम्ही पूर्ण तयारीत आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाईल असे अजिबात वाटत नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. कोणाचे कोणतेही बेजबाबदार वक्तव्य, कृती समाजातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्यासा कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे अशा वक्तव्यांमुळे समाजातिल शांतता धोक्यात येत असेल तर त्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करताना ती संघटना, व्यक्ती कोणी असले तरी पाहिले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल, असा ईशाराही वळसे पाटील यांनी या वेळी दिला. (हेही वाचा, Raj Thackeray Threat: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना धमकीचा फोन, सुरक्षेत करणार वाढ)

देशात काही लोक अशांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातही असे उद्योग सुरु आहेत. त्यामुळे हे हानून पाडण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत. ते पूर्ण तयारीत आहेत. कोणत्याही प्रकारे सामाजिक अशांतता निर्माण होणार नाही, याचीही काळजी आम्ही घेत असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले.