Devendra Fadnavis, Uddhav Thackeray (Photo Credit: PTI)

महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात नाईट कर्फ्यूसह अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. याच संदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. तसेच राज्यात लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांवर राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे.

"राज्यात पूर्ण एक महिन्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आली आहेत. हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना फटका बसत आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, वाहतूक खुली ठेवताना गॅरेज आणि स्पेअर्स पार्टस दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत. माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करून त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये", असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. हे देखील वाचा-Maharashtra: विकेंड लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार? चंद्रकांत पाटील यांचा सवाल

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट-

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादले गेले आहेत. त्याबाबतच्या गाइडलाइन्सनुसार, राज्यात सोमवारपासून (5 मार्च) केवळ अत्यावश्यक सेवांसोबत लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, रिक्षा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, मॉल, दुकाने, सिनेमागृह, नाट्यगृह, ब्युटी पार्लर, केशकर्तनालये, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात येणार आहेत. याचबरोबर शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक आहे.