महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta-Plus Varient) चे पाच बळी गेल्यानंतर आता समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचेच अजून 3 प्रकार आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सध्या या व्हेरिएंट्सच्या प्रसाराबाबत अधिक संशोधन करणं गरजेचे आहे. मात्र आताच्या घडीला महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 66 रूग्ण आहेत. त्यामध्ये Ay.1, Ay.2 आणि Ay.3 या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उपप्रकरांचा समावेश असल्याची माहिती जिनोम सिक्वेंसिंगच्या ताज्या रिपोर्ट्समधून समोर आली आहे. Delta and Delta Plus Variants FAQs: डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएन्टस: वारंवार विचारले जाणारे प्रश्न आण त्यांची उत्तरे.
वेगाने पसरणार्या डेल्टा व्हेरिएंट मध्ये म्युटेशन झाल्यानंतर डेल्टा प्ल्स व्हेरिएंट समोर आला होता. आता संशोधकांना या डेल्टा प्लस व्हेरिएंट मध्येही 13 अजून उप प्रकार असल्याचं आढळलं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट मध्ये Ay.1 ते Ay.13 असे तेरा विविध उपप्रकार आहेत. यापैकी पहिले 3 महाराष्ट्रात आहेत. मोनोक्लोनल अँटीबॉडीज कॉकटेलच्या उपचारांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट हा प्रतिरोधक असल्याचं समोर आलं होतं.
महाराष्ट्रातील 66 केसेसमधील 31 केसेस या Ay.1च्या आहात, 20 केसेस या Ay.3 च्या आहेत तर Ay.2 च्या 10 केसेस आहेत. Ay.1या एप्रिल महिन्यापासून आढळल्या आहेत. Ay.2 मार्च महिन्यापासून आढळल्या आहेत तर Ay.3 जून महिन्यापासून समोर आल्या आहेत. संशोधकांच्या मते Ay.3 हा प्रकार अमेरिकेच्या काही भागात झपाट्याने पसरत आहे. हा नॉन स्पाईक प्रोटीन म्युटेशन असून त्याच्याबद्दल अजूनही फारशी माहिती उपलब्ध नाही.
मुंबई मध्ये काही दिवसांपूर्वीच कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एका 63 वर्षीय महिलेचा डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. राज्यात डेल्टाची लागण झालेले 68% रूग्ण आहेत. प्रदीप आवटे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, डेल्टा प्लस फारसा गंभीर आजार निर्माण करत असल्याचं चित्र अद्याप नाही. डेल्टा वायरस हाच आपल्या समोरील मोठा प्रश्न आहे. सिक्वेन्स सॅम्पल मध्ये 1% रूग्ण हे डेल्टा प्लस व्हेरिएंट्स आहेत.