Delisle Bridge Closed: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अनधिकृत उद्घाटनानंतर डेलिसल पूल (Delisle Bridge) पुन्हा बंद करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) यासंदर्भात घोषणा केली आहे. परळ येथील डेलिसल रोड पूल येत्या तीन ते चार दिवसांत खुला केला जाईल. या पुलाचे काम पूर्ण होण्यास वर्षभराचा विलंब झाला आहे. हा पूल पावसाळ्यानंतर सुरू होणार होता. दरम्यान, 2018 मध्ये जीर्ण घोषित करण्यात आलेला, लोअर परळ स्टेशनजवळील रेल्वे रुळांवरून जाणारा हा पूल तात्काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तेव्हापासून पुलाचे काम सुरू आहे. पुनर्बांधणीची प्रक्रिया पाच वर्षांपासून रेंगाळली असून त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालकांना अडचणी येत आहेत. प्रवाशांसाठी लोअर परळच्या पश्चिम आणि पूर्वेला जोडणारी एकच लेन या सप्टेंबरमध्ये जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
गुरुवारी रात्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुलाच्या दुसऱ्या लेनचे अनधिकृत उद्घाटन झाले. मात्र, नंतर हा पूल बीएमसीने बंद केला. बीएमसी आणि पालकमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, 'पूर्ण पूल लोकांना वापरण्यासाठी खुला करण्यासाठी जवळपास 10 दिवस उलटून गेले आहेत. काल रात्री आम्ही त्याचे उद्घाटन केले आणि आज मुंबईतील नागरिकांना त्रास देण्यासाठी खोके सरकारच्या दबावाखाली बीएमसीने तो पुन्हा बंद केला आहे. सरकारी उद्घाटनाची वाट पाहत आहे. पालकमंत्र्यांच्या अहंकाराची आणि सोयीची वाट पाहण्याऐवजी तो लोकांसाठी का खुले केला जाऊ शकत नाही? (हेही वाचा - Mumbai Police booked Aditya Thackeray: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)
While we waited on the @mybmc to open the full bridge to people for use, it has been almost 10 days that the other side has been ready and waiting for a VIP to inaugurate it.
We inaugurated it last night and today, the BMC under the pressure of Khoke Sarkar has closed it down… pic.twitter.com/88xEyxpzkU
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 17, 2023
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, पुलाचे काम पूर्ण होऊनही तो बंदच राहिला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. दरम्यान, आयुक्त आय एस चहल यांनी पूल पूर्णपणे लोकांसाठी खुला करण्यासाठी प्रलंबित काम त्वरीत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पुलाच्या दुसऱ्या लेनचे अंतिम टच पूर्णत्वाकडे आले आहे. सिग्नल यंत्रणा बसवणे, स्ट्रीट लाईट सेटअप आणि लेन मार्किंग यासारखी अत्यावश्यक कामे पूर्ण झाल्यानंतर, सर्व लेन वाहतुकीसाठी खुल्या होतील.