शिवसेना (UBT) गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi Arrested) यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. भांडूप येथील राहत्या घरुन सकाळी आठ वाजणेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्यांना आजच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मुख्यमख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना भर सभेत अर्वाच्च भाषेत बोलणे आणि शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भूषण पलांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 153(अ),153 (ब),153(अ)(1)सी,294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केल्याप्रकरणीच त्यांना अटक झाल्याचे समजते. दरम्यान, दळवी यांना अटक झाल्याचे समजताच ठाकरे गटाचे कार्यकर्ते भांडूप पोलीस स्टेशनबाहेर मोठ्या संख्येने जमले आहेत.
संजय राऊत भांडूप पोलीस स्टेशनला जाणार
दत्ता दळवी यांना अटक झाल्याने उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते जोरदार आक्रमक झाले आहेत. ते सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. दरम्यान, शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत हे देखील भांडूप पोलीस स्टेशन येथे जाणार आहेत. तेथे ते प्रसारमाध्यांशीही संवाद साधणार असल्याचे समजते. भांडूप येथे उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा एक मेळावा रविवारी (26 नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना माजी महापौर, उपनेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ही टीका करत असताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे समजते. (हेही वाचा, Saamana Editorial on CM Eknath Shinde: 'गद्दार हृदयसम्राटांकडे भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'सामना'तून प्रहार)
भूषण पालांडे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल
शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भांडुप पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुख्यमंत्री हे संविधानीक पद आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल दळवी यांनी आक्षेपार्ह, अर्वाच्च आणि अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप केला आहे. प्राप्त तक्रारीवरुन गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
एएनआय एक्स पोस्ट
Former Mayor of Mumbai and Shiv Sena (UBT) leader Datta Dalvi has been arrested for allegedly using objectionable language against Maharashtra CM Eknath Shinde: Bhandup Police
— ANI (@ANI) November 29, 2023
अनेकांना आली नारायण राणे यांची आठवण
दरम्यान, दत्ता दळवी यांच्या अटकेनंतर अनेकांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दलही नारायण राणे यांनी काही वक्तव्यकेले होते. त्यानंतर नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल होताच नारायण राणे यांना अटक झाली होती. या कारवाईची देशभरात चर्चा झाली होती. खास करुन नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील नेत्याला अटक होणे ही धक्कादायक बाब मानली गेली हती.