Saamana Editorial on CM Eknath Shinde: 'गद्दार हृदयसम्राटांकडे भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'सामना'तून प्रहार
Uddhav Thackeray And CM Eknath Shinde | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Shiv Sena (UBT) Mouthpiece Criticize CM Eknath Shinde: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल (28 नोव्हेंबर) जोरदार टीकास्त्र सोडल्यानंतर पक्षाचे मुखपत्र दैनिक सामना संपादकियातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर आज (29 नोव्हेंबर) जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. राज्यात पडलेला अवकाळी पाऊस, अनेक ठिकाणी उद्भवलेली दुष्काळसदृश्य स्थिती, बेरोजगारी, शेतकरी कर्जमाफी आणि इतर अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री भाजपचा प्रचार करण्यासाठी इतर राज्यांमध्ये हजेरी लावत आहेत. याच मुद्द्यावरुन सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे. आधुनिक नीरो अशी मुख्यमंत्र्यांची संभावना करतानाच 'गद्दार हृदयसम्राट' म्हणूनही त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

'राजा मस्त, प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार'

दरम्यान, आधुनिक नीरो अशी मुख्यमंत्र्यांची संभावना करतानाच त्यांना 'राजा मस्त, प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार' असे म्हणत डिवचण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले आहे की, ''तेलंगणा व जयपुरातील निवडणुकीत भाजप उमेदवारांना खोके पोहोचविण्याचे काम राज्यातील गद्दार हृदयसम्राटांना देण्यात आले होते. निवडणुकांत खोके पोहोचविण्याची कामगिरी चोखपणे बजावणाऱ्या गद्दार हृदयसम्राटांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला मात्र पानेच पुसली. कटकारस्थाने करून सत्तेवर आलेला नीरो रोम जळत असताना फिडल हे वाद्य वाजवत बसला होता आणि अवकाळीच्या संकटात शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना महाराष्ट्राचे आधुनिक नीरो निवडणूक प्रचारात रमले आहेत. राजा मस्त आणि प्रजा त्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार अशी स्थिती महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हती''. (हेही वाचा, Saamana Editorial on Eknath Shinde Fiction: 'मिंधे गटाचा बाप गुजरात किंवा दिल्लीत असावा', दैनिक सामना संपादकीयातून जोरदार टीकास्त्र)

शेतकऱ्यांना नैराश्येतून बाहेर काढणे सरकारचे कर्तव्य

शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधताना राज्यातील शेतकऱ्यांची व्यथाच आजच्या संपादकीयातून माडण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासोबतच टीका करताना राज्य सरकारचे शेतकऱ्याप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीवही सरकारला करुन देण्यात आली आहे. ही जाणीव करुन देताना म्हटले आहे की, 'ज्यामध्ये शेतकरी संकटात सापडतो तेव्हा अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणे, शेतकऱ्यांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र कटकारस्थाने, लोकप्रतिनिधींची खरेदी-विक्री आणि निवडणूक प्रचारात रमलेले सरकार या कर्तव्यात कसूर करत असल्यामुळेच महाराष्ट्रात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सरकारची बेपर्वाई व अनास्था यामुळे शेतकरी इतके देशोधडीला लागले आहेत की, अवयव विक्री करून गुजराण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 10 शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापसाला भाव मिळत नसल्यामुळे किडनी, लिव्हर, डोळे व इतर अवयव विकत घेण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडेच केली आहे.

मुख्यमंत्री ‘मालक’ पक्षाच्या प्रचारात

महाराष्ट्रातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला असताना या संकटात त्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधावर जाण्याचे सोडून मिंधे सरकारचे मुख्यमंत्री तेलंगणात निवडणूक प्रचारात मग्न आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसही कायम प्रचारातच गुंतले आहेत, तर अजित पवार हे कोमात आहेत. महाराष्ट्राचा ‘पालक’ असलेला शेतकरी संकटात असताना त्याला भेटण्याचे सौजन्य न दाखवता मुख्यमंत्री आपले ‘मालक’ असलेल्या पक्षाच्या प्रचाराला निघाले आहेत. पालकाची काळजी सोडून मालकाची चाकरी करण्यात धन्यता मानणाऱ्या मिंध्यांना काय म्हणावे? परीट घडीचे पांढरेशुभ्र कपडे घालून तेलंगणात प्रचार करत असताना अवकाळीच्या तडाख्याने संकटात सापडलेला महाराष्ट्राचा शेतकरी आपल्याकडे मदतीसाठी आशेने बघतो आहे याचे भान नसेल तर यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?, असा थेट सवालही संपादकीयातून उपस्थित करण्यात आला आहे.