Shiv Sena in Two Faction: शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना संपादकीयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. शिंदे गटाचा उल्लेख मिंधे असा करत जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ‘बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) हे निष्ठावंतांचे बाप आहेत व राहतील. बाळासाहेब हे निष्ठावंतांचे ‘बाप’ आहेत व राहतील. मिंधे गटास एक तर बाप नसावा व असलाच तर तो गुजरात किंवा दिल्लीत असावा’, अशा तीव्र शब्दात सामनातून निशाणा साधण्या आला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेना पक्षातील दोन्ही गट आमने-सामने आले. त्या वेळी दोन्ही गटांमध्ये मोठा राडा झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य संघर्ष टळला असला तरी दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर आजच्या अग्रलेखात टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
दै. सामना संपादकीयात काय म्हटले आहे?
'शिवतीर्थावर जे घडले, ते दुर्दैवी'
'शिवतीर्थावर जे घडले, ते दुर्दैवी असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले. मराठी माणसांत फूट पाडून, संघर्ष घडवून दिल्लीचा सुल्तान मजा पाहत आहे, हे दुर्दैवच आहे. पण हा संघर्ष अटळही आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांनी तेथे यावे व श्रद्धेचा बाजार मांडावा हे योग्य नाही'.
'खोकेच खोके असल्याने उच्च प्रतीचे नशापाणी'
'मिंधे गट स्वतःला ‘शिवसेना’ मानतो. हा गट उद्या स्वतःला अमेरिकेतील रिपब्लिकन, डेमोक्रॅट किंवा इंग्लंडमधील हुजूर किंवा मजूर पक्षही समजू शकतो. तो त्यांचा प्रश्न. चार आण्याची भांग प्यायले किंवा रुपयाचा गांजा चिलमीत भरून मारला की अशा कल्पना सुचतात. इथे तर खोकेच खोके असल्याने उच्च प्रतीचे नशापाणी करून कल्पना सुचत असतील'. (हेही वाचा - Mumbai Police booked Aditya Thackeray: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल)
'फुटीर गटाविरोधात लोकमत बिथरले'
'शिवसेनेतील फुटीर गटाविरोधात लोकमत बिथरले आहे. त्यामुळे या गटातील काही खासदार व आमदारांनी असे जाहीर केले की, “गरज पडली तर आम्ही कमळ चिन्हावर लढू.” आता कमळ चिन्हावर लढू असे सांगणाऱयांची ‘शिवसेना’ कशी? व कमळाबाईच्या ओटीत शिरलेले ‘शिवसैनिक’ कसे? त्यामुळे ही ओटी शिवतीर्थावर पोहोचताच शिवसैनिकांनी त्यांना अडवले'.
'स्मृतीस्थळावर कमळाबाई पुरस्कृत काही लोक'
'शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर कमळाबाई पुरस्कृत काही लोक, बाळासाहेब हे आमचेही ‘बाप’ असल्याचे तावातावाने बोलत होते. ते ऐकून लोकांचे हसून पोट दुखले. बाळासाहेब हे निष्ठावंतांचे ‘बाप’ आहेत व राहतील. मिंधे गटास एक तर बाप नसावा व असलाच तर तो गुजरात किंवा दिल्लीत असावा. कारण ज्या बेफाम पद्धतीने ते लोक वागत आहेत व महाराष्ट्रविरोधी कारस्थानांत सहभागी होत आहेत ते पाहता यांचा बाप शिवरायांच्या मातीत व बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत असूच शकत नाही'.
दरम्यान, दैनिक सामनातून झालेल्या टीकेला शिंदे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर येण्याची शक्यता आहे. अद्यापत तरी शिंदे गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी दोन्ही गटांमध्ये सुरु असलेला शाब्दीक युद्धाची पार्श्वभूमी पाहिल्यास ही प्रतिक्रिया अपेक्षीत आहे.