Cyclone Tauktae: आदित्य ठाकरे यांची बीएमसी कंट्रोल रुमला भेट, नागरिकांना घरीच सुरक्षीत थांबण्याचे अवाहन
Aaditya Thackeray | (Photo Credits-Twitter)

अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आलेले तोक्ते हे चक्रिवादळ (Cyclone Tauktae) आता गुजरातच्या दिशेने सरकरत आहे. वादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. या संदर्भात महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारशी चर्चा करत आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील कंट्रोल रुमला (BMC Control Room) भेट दिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस आजवर कुणीही पाहिला नसेल इतका पाऊस पडत आहे. मोठ्या प्रमाणावर झाडे उन्मळून पडली आहेत. आणखीही पुढचे काही काळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे, असेही अवाहन आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

तीन कोविड सेंटर खाली- आदित्य ठाकरे

मुंबईतील तीन कोरोना सेंटर खाली करण्यात आली आहे. त्यातील कोविड रुग्णांना रुग्णांना इतरत्र हालविण्यात आले आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने त्यांना इतरत्र हालवणे सोपे गेले असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, मुंबईत साचलेल्या पाण्यावरुन विरोधक टीका करत असल्याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, विरोधकांच्या टीकेला आता कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही. खास करुन जर वादळाच्या पार्श्वभूमीवर हे लोक टीका करत असतील तर त्यांना करु देत. वादळ हे निसर्गनिर्मित आहे. गेल्या वर्षीही असे वादळ आले होते. परंतू, हे वादळ त्या वेळी पावसाळ्यात आले होते. आता हे वादळ उन्हाळ्यात आले आहे. त्यातही इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे. (हेही वाचा, Cyclone Tauktae: रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळाचे थैमान! भिंत कोसळल्याने 2 महिलांचा मृत्यू)

वादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. परंतू, असे असले तरी मुसधार पावसाची शक्यता कायम आहे. याशिवाय वादळ गेले तरी त्याचे परीणाम जाणवत राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. गेल्या 2 वर्षांत दक्षिण मुंबईला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रिवादळ आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार चर्चा करत असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.