Cyclone (Photo Credits: Pixabay)

Cyclone Biparjoy News: चक्रीवादळ बिपजॉय हळूहळू आपले रौद्र रुप धारण करत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मध्य अरबी समुद्रात गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 840 किमी आणिमुंबईच्या पश्चिम-नैऋत्येस 870 किमी अंतरावर पुढील 36 तासांत आणखी हळूहळू तीव्र होईल. तसेच ते पुढील 2 दिवसांत जवळजवळ उत्तर-वायव्य दिशेला जाईल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन गुजरात सरकारने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करण्यास न जाण्याचा सल्ला दिला आहे. चक्रीवादळ 'बिपरजॉय' उत्तरेकडे निघाले आहे. सध्या ते गुजरातच्या किनारपट्टीच्या पोरबंदर जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्येकडे सुमारे 900 किमी केंद्रस्थानी आहे. शिवाय बंदरांवर आवश्यक ठिकाणी दक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, महाराष्ट्रात समुद्रकिनारपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणावर लाटा उसळल्याचे पाहायला मिळेल. खास करुन मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीवर लाटांचे प्रमाण अधिक असेल. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी जाऊ नये, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, बिपरजॉय चक्रीवादळ होणार अधिक तीव्र; पुढचे 48 तास महत्त्वाचे, आएमडीने दिला इशारा)

ट्विट

बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून किनारपट्टी परिसरात साधारण 8 ते 10 फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. ही स्थिती पुढेच दोन दिवस म्हणजेच साधारण 12 जूनपर्यंत कायम राहू शकते. हे चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागातून पुढे सरकत असल्याने या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा परिणाम म्हणून परिसरात मोठ्या सोसाट्याचा वारा वाहू लागेल. इतकेच नव्हे तर, काही ठिकाणी पाऊसही पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.