विमा (Insurance Policy) मिळवून देण्याच्या नावाखाली मुंबई (Mumbai) येथे एका नागरिकाची तब्बल 1.14 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या 60 वर्षीय नागरिकाने मुंबईतील पूर्व विभागात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. नागरिकाने दिलेल्या तक्रारीवरुन सायबर (Cyber Police) पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. फसवणुक करणाऱ्यांनी नागरिकाला आपण सरकारी अधिकारी असल्याचे भासवत विम्याचे पैसे (Cyber Insurance Fraud) मिळवून देण्याचे आमिश दाखवले आणि वृद्धाकडून लाखो रुपयांची फसवणूक केली.
प्राप्त माहितीनुसार, पीडित नागरिक हा मुंबई येथील ट्रॉम्बे परिसरातील रहिवासी आहे. एक दिवस त्याला अंजली वर्मा नामक व्यक्तीचा फोन आला. त्याने आपण सरकारी अधिकारी असल्याची ओळख सांगितली. तसेच, केंद्र सरकारच्या कर्मचारी गट विमा योजनेच्या (CGEGIS) अंतर्गत प्रलंबित असलेल्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याची योजना आहे. हे पैसे मिळवून देण्यासाठी आपली मदत करण्याच्या उद्देशाने आपण फोन केल्याचे संबंधित व्यक्तीने पीडित नागरिकास सांगितले. पीडित नागरिकाने संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले. त्यामुळे या नागरिकांची आरोपींनी लाखो रुपयांची फसवणूक केली. (हेही वाचा, UPI Fraud: ऑनलाईन पेमेंट करताना सावधान! KYC, SIM आणि Bank च्या नावावर होऊ शकते फसवणूक)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली वर्मा यांनी सुरुवातीला पीडित नागरिकास प्रोसेसिंग चार्जेस आणि रजिस्ट्रेशन फीच्या नावावर थोड्या प्रमाणात पैसे देण्यास सांगितले आणि नंतर रक्कम वाढवली. प्रत्येक वेळी पीडिताला आश्वासन देण्यात आले की, त्याने आतापर्यंत भरलेल्या पैशांसह, विमा लाभांसह संपूर्ण पैसे एकत्र परत केले जातील. फसवणूक करणारे लोकही इतर लोकही अंजली वर्मा यांच्यासोबत गुन्ह्यात सहभागी झाले. ते पीडिताला आश्वासन देत राहिले की लवकरच त्याला संपूर्ण रक्कम परत केली जाईल.
पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले की, पीडित नागरिकांने थोडे थोडे असे जवळपास 1.14 कोटी रुपये दिले. तेव्हाच त्याला काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने अंजली वर्मा (आरोपी) यांच्याशी संवाद थांबवत पोलिसांत तक्रार दिली.
पूर्व विभाग सायबर पोलिसांनी सोमवारी (30 ऑगस्ट) नऊ आरोपींविरोधात एफआयआर नोंदवला. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 419 (फसवणूक) आणि 420 (फसवणूक) अंतर्गत कलम 66 डी (संगणक संसाधनांचा वापर करून व्यक्तिमत्त्वाद्वारे फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही आरोपींचे मोबाईल नंबर आणि बँक डिटेल्सच्या मदतीने त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. आम्ही बँकांना खाती गोठवण्यासही सांगितले आहे जेणेकरून अद्याप काही पैसे असतील तर ते जप्त केले जाऊ शकतात.