Section 144 Imposed in Nagpur: तृतीयपंथीयांना रोखण्यासाठी नागपूरमध्ये जमावबंदी, शहर पोलिसांकडून कलम 144 लागू
Representative Image (File Image)

नागपूर (Nagpur) शहरातील सार्वजनिक ठिकाणी पोलिसांनी (Nagpur Police) फौजदारी प्रक्रिया संहिता (Code of Criminal Procedure) चे कलम 144 (CrPC Section 144) लागू केले आहे. म्हणजेच हे कलम लागू असणाऱ्या ठिकाणी जमावबंदी, संचारबंदी असणार आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरातील सार्वजनिक ठिकाणी तृतीयपंथींना (Eunuchs) बेकायदेशिरीत्या एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी हे कलम (Section 144 imposed in Nagpur) लावण्यात आले आहे. नागपूर शहरात काही दिवसांपूर्वी खंडणीच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तृतीयपंथीयांच्या दोन गटाविरुद्ध खंडणीच्या आरोपाखाली दोन फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत.

नागपूर पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरांतील तृतीयपंथी सार्वजनिक ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स, लोकांची घरे, लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांना निमंत्रित न करता भेट देतात, अश्लील कृत्य करतात आणि नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतात. याबाबत वारंवार अशा तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी पुढे म्हटले आहे की, काही नागरिकांना तृतियपंथीयांच्या गैरवर्तनालाही सामोरे जावे लागले आहे. अनेक वेळा त्यांच्याकडून झालेल्या शारीरिक हल्ल्याचाही सामना करावा लागला. हे तृतीयपंथी नागरिकांकडे पैशांची मागणी करतात. ती पूर्ण झाली नाही तर ते अश्लिल हावभाव करतात. ज्यामुळे सामान्य माणसाच्या मनात लज्जास्पद भावना उत्पन्न होते, असे पोलिस आयुक्त (CP) अमितेश कुमार यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, नागपूरमध्ये लागू करण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास, भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि इतर कायदेशीर तरतुदींच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई केली जाईल, असेही या पत्रकात म्हटले आहे.