कल्याण: मोदींच्या सभेसाठी स्मशानभूमी बंद; अंत्ययात्रांना बंदी?
पंतप्रधान मोदी | (Photo courtesy: Archived, Edited Images)

पंतप्रधान मोदी (Pm Modi) यांच्या कार्यक्रमासाठी चक्क स्मशानभूमी (Crematorium) काही काळ बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय प्रशासनाने घेतल्याचा प्रकार पुढे आला आहे. केवळ स्मशानभूमीच नव्हे तर, मोदींच्या कार्यक्रमादरम्यान ठरवून दिलेल्या कालावधीत नागरिक मृत व्यक्तीची अंत्ययात्राही (Funeral) काढणार नाहीत याची दक्षता प्रशासन घेणार आहे. कल्याण-भिवंडी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी आज (मंगळवार, 18 डिसेंबर) कल्याणमध्ये येत आहेत. येथील फडके मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे सुरक्षेची खबरदारी म्हणून प्रशासनाने कल्याण (Kalyan) येथील फडके मैदान नजीकची लालचौकी स्मशानभूमी काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत प्रशासनाने तीन विवाह सोहळे आगोदरच रद्द केले आहेत. त्यात पुन्हा स्मशानभूमीही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक नारगिरांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

दै. सामनाने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार पंतप्रधानांचा दौरा जाहीर होऊन कार्यक्रम स्थळही नक्की होताच पालिका प्रशासनाने फडके मैदानाचा ताबा घेतला. तसेच, पोलीसांनी मैदान आणि परिसराचा सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेतला. सुरक्षेच्या कारणास्थव मैदानानजिकच्या वाधवा हॉल येथे पार पडणारे तीन पूर्वनियोजित विवाहसोहळे प्रशासनाने तातडीने रद्द केले. त्यामुळे वधू-वर पक्षांतील कुटुंबीय संतापले असतानाच पालिका प्रशासनाने लालचौकी स्मशानभूमीला टाळे ठोकले. त्यामुळे मोदी कल्याणमध्ये असे पर्यंत मृत्यू थांबणार आहे काय? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. (हेही वाचा, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा बहिष्कार, विरोधकांचेही टीकास्त्र)

दरम्यान, मोदींच्या कार्यक्रम काळात एखादे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आल्यास त्याला लालचौकी स्मशानभूमित प्रवेश करता येणार नाही. त्याऐवजी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. लालचौकी स्मशानभूमीकडे एखादी अंत्ययात्रा आलीच तर, ती एक किलोमीटरवरील बैलबाजार स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रकार म्हणजे पंतप्रधान मोदी कल्याणध्ये असेपर्यंत मृतदेहाची हेळसांड करण्याचाच प्रकार असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.