Covid-19 Vaccine Dry Run | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढ्यात भारत एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहचला आहे. आजपासून (शनिवार, 2 जानेवारी) सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कोविड-19 लसीच्या (Covid-19 Vaccine) ड्राय रन (Dry Run) ला सुरुवात होणार आहे. या ड्राय रन्स 116 जिल्ह्यातील 259 केंद्रांवर होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन (Dr. Harshvardhan) यांनी काल देशभरातील लसीकरण मोहीमेच्या सर्व ठिकाणांवर सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर, जालना आणि नंदुरबार येथे लसीची ड्राय रन होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात 3 लसीकरण केंद्र उभारण्यात आली असून त्या प्रत्येक केंद्रात लसीकरणासाठी 25 लोक असणार आहेत.

राज्यातील पुण्यात जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र मान, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील जिजामाता रुग्णालय केंद्र असणार आहे. तर नागपूर मध्ये डागा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय कामटी, नागपूर महापालिकेचे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ट्राय रन होणार आहे. तसंच जालना येथील जिल्हा रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय अंबड, बदनापूर तालुक्यातील शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंदूरबार येथील जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टे आणि नवापूर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी लसीची ड्राय रन होणार आहे.

दरम्यान, लसीकरण मोहिमेदरम्यान कोणताही गोंधळ होणार नाही यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्यमंत्र्यांनी दिली. यावेळी लसीकरण मोहिमेदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घालून दिलेल्या सूचना, नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ड्राय रन साठी एसओपी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी देण्यात आली आहे. यासाठी देश पातळीवर झालेल्या ट्रेनिंगमध्ये 2360 लोकांना तर जिल्हा पातळीवर 57000 जणांना ट्रेनिंग देण्यात आलं आहे. यापूर्वी 28 आणि 29 डिसेंबरला आसाम, आंध्र प्रदेश, पंजाब आणि गुजरात या राज्यांमध्ये कोविड-19 लसीची ड्राय रन यशस्वीरीत्या पार पडली आहे.

गेल्या मार्च महिन्यापासून सुरु झालेले कोरोना व्हायरसचे संकट अद्याप कायम असून त्यात आता नव्या कोविड-19 स्ट्रेनची भर पडली आहे. देशात या नव्या स्ट्रेनचे 29 रुग्ण आढळून आले आहेत.