Raj Thackeray (Photo Credits: PTI/File)

महाराष्ट्रात वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता आता आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. अशामुळे कोरोना वायरस पासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण हा एक एकच पर्याय आहे. आणि त्याचा वेग आता वाढवण्यासाठी महाराष्ट्राकडून मागणी होत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून केंद्रासोबत त्याचा पत्रव्यवहार सुरू आहेच पण आता मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रूग्णांबाबत चिंता व्यक्त करताना 100% लसीकरणासाठी खाजगी संस्थांना खस खरेदीची परवानगी मिळावी म्हणून मागणी केली आहे.

आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लिहलेल्या पत्रामध्ये 5 प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये राज्यात 100% लसीकरण करण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी आहे. यामध्ये त्यांनी सीरम सारख्या लस निर्मिती संस्थांना मुक्तपणे राज्यात लस उपलब्ध करून देण्याची मुभा असावी तसेच हाफकीन, हिंदुस्तान अ‍ॅन्टिबायोटिक यांनादेखील लस निर्मितीची मुभा मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. रेमडेसीवीर, ऑक्सिजन चा तुटवडा असल्याने त्याची सोय करण्यासाठी देखील राज्याला काही निर्णय घेण्यासाठी मोकळीक असावी असे म्हटलं आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोना संख्या, मृत्यू संख्या अधिक असल्याने एका टप्प्यानंतर लॉकडाऊन सारखा कडक निर्णय घ्यावा लागतो. पण यामुळे सर्वसामान्यांचे, व्यापार्‍यांचे अतोनात नुकसान होत आहे. असे सारखे लॉकडाऊन लावणं परवडणारे नसल्याचं सांगत 'आरोग्या'चा विचार करता महाराष्ट्रात 100% लसीकरणाची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. Sputnik V रशियाच्या COVID-19 Vaccine ला भारतामध्ये DCGI कडून मंजुरी; RDIF ची माहिती.

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र तेव्हा राज ठाकरे त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नव्हते. पण आज त्यांनी थेट मोदींना पत्र लिहून राज्यातील ढासळत असलेल्या आरोग्य यंत्रणेकडे लक्ष वेधले आहे.