BMC | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट मुंबईत (Mumbai) अजूनही दाट आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण  मुंबईत आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य उपचार, उत्तम सेवा-सुविधा मिळाव्यात यासाठी मुंबई महानगरपालिका सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नवनवीन उपाययोजनांसह कोरोना व्हायरसमुळे ओढावलेली गंभीर परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न BMC करत आहे. आता कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती देण्याची नवीन पद्धत BMC ने सुरु केली आहे. 1 जुलै 2020 पासून ही पद्धत लागू करण्यात येणार आहे. मृतांची माहिती देण्यासाठी गुगल फॉर्म सुरु करण्यात आला आहे.  हॉस्पिटलमध्ये कोविड-19 (Covid-19) मुळे झालेल्या मृतांचा आकडा संबंधित हॉस्पिटलमधील नोडल अधिकारी यांनी 48 तासांत गुगल फॉर्ममध्ये भरणे अनिवार्य आहे. अशा सूचना मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत.

तसंच कोविड-19 ची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर सर्वप्रथम तो रिपोर्ट मुंबई महानगरपालिकेला द्या. त्यानंतर तो रिपोर्ट खाजगी आणि सरकारी रुग्णालयाला मिळेल. तेथून पुढे तो रुग्णांना देण्यात येईल, अशी सूचना यापूर्वी मुंबई महानगरपालिकेने दिल्या आहेत. (कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रिपोर्ट पहिल्यांदा रुग्णाला नाही MCGM ला द्या- मुंबई महापालिका आयुक्तांचे चाचणी केंद्रांना आदेश)

ANI Tweet:

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 147741 इतकी असून एकट्या मुंबईत कोरोनाचे 70878 रुग्ण आहेत. त्यापैकी 39149 रुग्णांची प्रकृती उपचारानंतर सुधारली असल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 4062 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. दरम्यान रुग्णसंख्येत दर दिवशी मोठी भर पडत आहे.