Coronavirus: कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यास रिपोर्ट पहिल्यांदा रुग्णाला नाही MCGM ला द्या- मुंबई महापालिका आयुक्तांचे चाचणी केंद्रांना आदेश
Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

एखाद्या व्यक्तिची कोविड 19 चाचणी ( COVID-19 Test Reports) पॉझिटीव्ह आली तर प्रयोगशाळेतून त्याबाबतचा मिळणारा अहवाल थेट रुग्णांना देऊ नका. आगोदर त्याची माहिती मुंबई महापालिकेला (BMC) द्या अशी अजब सूचना मुंबई महापालिकेने चाचणी केंद्रांना दिल्या आहेत. सूचनांबाबतच्या या 13 जूनच्या आदेशाबाबत महापालिका आयुक्तांनी (BMC Commissioner) स्पष्टीकरण दिले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणीबाबतच्या आदेशावर विरोधकांनी टीका केली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने आयुक्तांच्या स्पष्टीकरणाच्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर चाचणी केंद्रांनी त्याची माहिती आगोदर महापालिकेला द्यावी. त्यानंतर मुंबई महापालिका हा अहवाल खासगी आणि सरकारी रुग्णालये तसेच, रुग्णांना हस्तांतरीत करेन. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही एएनआयशी बोलताना चाचणी केंद्र कोविड 19 संक्रमित रुग्णाचा अहवाल त्याला थेट न देता तो महापालिकेला आगोदर देईल, असे म्हटले आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसची लक्षणे नसलेला अथवा कोरोना चाचणी पॉजिटीव्ह नसलेला व्यक्ती कोरोना व्हायरस रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येऊ नये. तसेच कोरोना रुग्णाची नेमकी माहिती प्रशासानाला मिळावी. कोरोना रुग्णासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयात कोविड बेड किंवा आयसीयू बेड वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी काळजी घेण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Coronavirus in Mumbai: मुंबईत 1298 रुग्णांसह कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 62,799 वर)

दरम्यान, महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णसंख्या 62,799 इतकी आहे. त्यातील 31,856 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. 27,634 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 3,309 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे.