Coronavirus Outbreak | Representational Image (Photo Credits: PTI)

चीनमध्ये (China) उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) गेल्या काही आठवड्यांमध्ये भीषण रूप धारण केले आहे. आता तर जगातील अनेक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे व बघता बघता भारतामध्येही त्याने शिरकाव केला आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात आज नवीन दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून भारतातील विमानतळावर याबाबत कडक तपासणी सुरु आहे.

दिल्ली मुंबईसह (Mumbai) देशातील जवळजवळ सर्वच विमानतळांवर रोज हजारो लोकांची तपासणी होत आहे. आज याबाबत महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने माहिती दिली.

आजपर्यंत मुंबई विमानतळावर 551 विमानांमधून 65,621 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून 401 प्रवासी येत आहेत. कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आलेल्या 152 प्रवाशांना सर्वांपासून दूर, एकटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार यापैकी, 149 जणांची तपासण नकारात्मक आली. 3 लोकांच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. (हेही वाचा: केंद्र सरकारची नवीन प्रवासी नियमावली जारी: चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास टाळावा, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचा भारतीयांना सल्ला)

दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे भारताने, इराण, इटली, जपान आणि दक्षिण कोरिया येथील प्रवाशांचा व्हिसा निलंबित केला आहे. इराणहून परत आलेल्या भारतीय लष्कराच्या मेजरला सावधगिरीचा उपाय म्हणून, मध्यप्रदेशातील महू येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी एकांतात राहण्यास सांगितले गेले आहे. त्यांना कोणत्याही लष्करी रुग्णालयात दाखल केले जात नाही आणि आल्यावर वैद्यकीय तपासणी व्हावी ही त्यांची स्वतःची इच्छा आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या इटालियन पर्यटकाच्या पुष्टीनंतर, त्याच्या पत्नीचा हवालही सकारात्मक आला आहे. त्यानंतर आता देशभरात सरकारने विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.