देशात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढतच आहे. या आजारावर लस उपलब्ध नाही, की कोणते औषध नाही, त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशात सोशल मीडियावर, विविध अॅप्लिकेशन्सवर खोट्या, फेक मेसेजेसचा (Fake Messages) सुळसुळाट आहे, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. ही समस्या ओळखून मुंबई पोलिसांनी याबाबत एक इशारा दिला आहे. सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्लिकेशनवर दिशाभूल करणार्या व भीती पसरवणाऱ्या संदेशांबाबत दोषी आढळून आलेल्या संबंधित अॅप्लिकेशनवरील, 'अॅडमीन' विरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे.
कोरोना व्हायरसच्या या संकट काळात सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अपमानास्पद संदेश रोखण्यासाठी, मुंबई पोलिसांनी ग्रुप्सच्या अॅडमीनवर त्यांनी अशा कंटेंटला परवानगी दिली म्हणून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, हा साथीचा रोग आणि त्यामुळे सुरु असलेले लॉकडाऊन लक्षात घेता पोलिस सोशल मीडियावर होणाऱ्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आहेत.
मुंबई पोलीस ट्वीट -
सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्लिकेशनवर दिशाभूल करणार्या व भीती पसरवणाऱ्या संदेशांचा प्रसार रोखण्यासाठी आता दोषी आढळून आलेल्या संबंधित अॅप्लिकेशनवरील 'अॅडमीन' विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.#TakingOnCorona (१/२)
— Mumbai Police (@MumbaiPolice) April 10, 2020
व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया मंचांवर काही खास विशिष्ट समुदायांविषयी, संदेश, व्हिडिओ किंवा मीम्सच्या माध्यमातून चुकीची आणि अपमानास्पद माहिती फिरत राहते. अशा सोशल मीडिया पोस्टमुळे भीतीचे वातावरण, गोंधळ आणि अधिकाऱ्यांविषयी अविश्वास निर्माण होतो. सध्याच्या कोरोना व्हायरस संकटकाळात तर या गोष्टी वाढल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनांची दखल घेऊन मुंबई पोलिसांनी कारवाईचा हा आदेश जारी केला आहे. अशाप्रकारे मेसेंजर आणि सोशल मीडिया मंचांवरील ग्रुपवर येणाऱ्या कोणत्याही माहितीसाठी अॅडमीन्सना जबाबदार धरले जाईल. (हेही वाचा: Hydroxychloroquine युक्त कलौंजी बियांमुळे कोरोना व्हायरस बरा होऊ शकतो? जाणून घ्या व्हायरल होत असलेल्या मेसेजची सत्यता)
दरम्यान, व्हॉट्सअॅपने फेक मेसेजेसला आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला आहे. व्हॉट्सअॅने एक नवीन अपडेट आणले आजे, जे वापरकर्त्यास बातम्यांची सत्यता इंटरनेटद्वारे तपासणीसाठी मदत करेल.