Coronavirus In Maharashtra: महाविकास आघाडीच्या नेत्यांमुळेच राज्यात कोरोना वाढला; भाजप नेते गिरीश महाजन यांचा आरोप
Girish Mahajan | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रात (Maharashtra) अटोक्यात येत असलेला कोरोना (Coronavirus) पुन्हा एकदा डोके वर काढू लागला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहेत. राज्यातील विविध शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात कोरोनाचे नियम अधिक कडक केले जात आहेत. तसेच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांची वाढ होत आहे, त्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु, महाराष्ट्रात कोरोनाची जी परिस्थिती निर्माण आहे, याला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेते जबाबदार आहेत. तसेच या नेत्यांमुळेच राज्यात कोरोना वाढला आहे, असा आरोप भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धार्मिक, सामाजिक, राजकीय सभा, समारंभ, मिरवणुका, मोर्चे आदींवर बंदी घातली आहे. दरम्यान, शिवजयंती साजरी करणाऱ्या नागरिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, ठाकरे यांचे निर्बंध म्हणजे 'लोका सांगे ब्रम्हज्ञान' असे आहे. सरकारमधील मंत्री व नेते जयंत पाटील, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये यात्रा, मोर्चे, सभा आयोजित केल्या होत्या. यामुळेच राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. हे देखील वाचा- मुंबईत लग्नसमारंभ आणि सार्वजनिक कार्यक्रमातून कोरोना वाढला, BMC चे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली माहिती

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव पृथ्वीराज महाडिक यांचे काल (21 फेब्रुवारी) रोजी वैष्णवी हिच्यासोबत लग्न झाले. अनेक राजकीय नेते आणि दिग्गजांच्या उपस्थितीत हा शाही विवाह सोहळा पार पडला. मात्र, या सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी धनंजय महाडिक आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या लग्नात शंभरहून अधिक पाहुणे उपस्थित होते. त्यापैकी अनेक नेते विनामास्क असल्याचे सांगण्यात येत आहे.