Brihanmumbai Municipal Corporation (Photo Credits: PTI)

राज्यासह मुंबईतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने आता धडक मोहिम सुरु केली असून यात कोरोनाचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई केली जात आहे. यात आतापर्यंत केलेल्ये सर्वेनुसार, मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी दिली आहे. दरम्यान हॉटेल्स, बार, पब्ज, हॉल यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी मुंबई महापालिकेचे छापे टाकण्याचे काम सुरु आहे. यात कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे.

मुंबईकरांनी कोरोना नियमांची काटेकोर अमंलबजावणी केल्यास लॉकडाऊन करण्याची वेळ येणार नाही. मुंबईत सध्या नाईट कर्फ्यू लागू करण्यापेक्षा लोकांमध्ये कोरोना विषयक जागृती करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- मुंबई मध्ये काल दिवसभरात विना मास्क फिरणा-या लोकांकडून 28.20 लाखांचा दंड वसूल- BMC

मुंबईकरांनी मास्क लावणं बंधनकारक आहे. मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जात असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येत आहे. प्रसंगी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांचीही मदत घेतली जाईल. अशा लोकांकडून पोलीस जो दंड वसूल करतील त्यातील 50 टक्के रक्कम महापालिकेला मिळेल आणि उरलेली 50 टक्के रक्कम पोलीस कल्याण निधीला देण्यात येईल, असंही सुरेश काकणी यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान मुंबईत मागील 24 तासांत 760 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,19,888 वर पोहोचली आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तसेच आज दिवसभरात 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 11,446 वर पोहोचली आहे.