Mumbai Drive in Vaccination: मुंबईत 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’; तुमच्या नजिकचे लसीकरण केंद्र इथे पाहा
Drive in Vaccination | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) करत असलेल्या उपाययोजनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच कौतुक केले. त्यानंतर मुंबई महापालिका (BMC ) आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. कोरोना व्हायरस संसर्ग थोपविण्यासाठी मुंबई महापालिकेने ड्राईव्ह-इन लसीकरण (Drive in Vaccination) केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. दादर येथे सुरु केलेल्या पहिल्याच ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ (Drive in Vaccination) केंद्राला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता मुंबईतील इतर 14 ठिकाणी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्रे सुरु करण्याचा निर्णय बिएमसीने घेतला आहे. सध्यास्थितीत मुंबईत सुमारे 80 हून अधिक पालिकेसह खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. त्याच्याच जोडीला ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रं सुरु झाल्याने लसीकरणास मोठा हातभार लागणार आहे. मुंबईत सुरु होणारी ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्रं कोणकोणत्या ठिकाणी असतील घ्या जाणून. इथे तुम्हाला तुमच्या नजीक असलेले ड्राईव्ह-इन लसीकरण केंद्र कोणते याबाबतही माहिती मिळू शकेल.

'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ म्हणजे काय? त्याचा फायदा कोणाला?

दिव्यांग, अपंग, वृद्ध लोकांना मुंबई शहरात होत असलेल्या लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता येत नाही. अनेकदा त्यावर मर्यादा पडतात. त्यातही लसीकरण केंद्रावर मोठी रांग असल्यामुळे अनेक असहाय लोकांची परवड होते. अशा वेळी 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ कामी येते. 'ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ किंवा ' ड्राईव्ह-इन लसीकरण' याचा अर्थ असा की, अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या लसीकरणात नागरिकांना रांगा लावण्याची गरज नाही. नागरिकांच्या नजिकच्या ठिकाणी एक छोटेखणी लसीकरण केंद्र असेल. जे वाहनामध्ये असते. या ठिकाणी नागरिकांनी पार्किंग गेटने आत यायचे आणि वाहनात बसून लस घ्यायची. त्यानंतर लगेच दुसऱ्या गेटने बाहेर बडायचे. या पद्धतीला ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ म्हटले जाते. प्राप्त माहितीनुसार, ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ उपक्रमांत वय वर्षे 45 पेक्षा पुढच्या नागरिकांचे लसीकरण केले जाईल. (हेही वाचा, BARC करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा, खासदार राहुल शेवाळे यांनी दिली माहिती)

मुंबईत कोणकोणत्या ठिकाणी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ केंद्र?

 1. अंधेरी स्पोर्ट्स क्लब ग्राऊण्ड
 2. कूपरेज ग्राऊण्ड
 3. शिवाजी स्टेडियम
 4. ओव्हल मैदान
 5. ब्रेबॉर्न स्टेडियम
 6. एमआयजी ग्राऊण्ड
 7. एमसीए ग्राऊण्ड
 8. रिलायम्स जिओ ग्राऊण्ड
 9. वानखेडे स्टेडियम
 10. संभाजी उद्यान (मुलुंड)
 11. सुभाष नगर ग्राऊण्ड (चेंबुर)
 12. टिळक नगर ग्राऊण्ड (चेंबुर)
 13. घाटकोपर पोलीस ग्राऊण्ड
 14. शिवाजी मैदान (चुनाभट्टी)

दादर येथील कोहिनूर मिल पार्कींग परिसरात सुरु असलेले ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’ प्रचंड प्रतिसाद मिळूनही बंद करावे लागले. कारण या ठिकाणी ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’चा लाभ घेण्यासाठी लोकांची रांग लागल्याने वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे पोलिसांनी हे केंद्र बंद करुन इतरत्र हालवायला सांगितले. दरम्यान, कोणत्याही केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी गेले तरी लसीकरण हे कोविन अॅप द्वारे नोंदणी केलेल्यांचेच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आगोदर नोंदणी करावी आणि मग त्यानंतरच लस घेण्यासाठी केंद्रावर जावे, असे मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटले आहे.