BARC करणार मुंबईला ऑक्सिजनचा पुरवठा, खासदार राहुल शेवाळे यांनी दिली माहिती
Rahul Shevale and BARC (Photo Credits: FB, TWITTER)

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढता आकडा लक्षात घेता शहरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही परिस्थिती संपूर्ण देशाची आहे. मुंबईची ही गरज लक्षात घेता ही समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी 'भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रा'तील (BARC) शास्त्रज्ञांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ABP माझाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्लांटमधून पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 50 लिटरचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांनी दिली.

खासदार राहुल शेवाळे यांनी बीएआरसीच्या अधिकारी-शास्त्रज्ञांसोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बीएआरसीने विशेष प्लांट तयार करून पाण्यापासून ऑक्सिजनची निर्मिती करायला सुरुवात केली. या प्लांटमधून, प्रत्येकी 50 लिटर ऑक्सिजनचे सुमारे 10 सिलेंडर उपलब्ध केले जाणार आहेत.हेदेखील वाचा- महाराष्ट्र: केंद्राने 50 टन ऑक्सिजन पुरवठा थांबवणे योग्य नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हे सिलेंडर दक्षिण-मध्य मुंबईतील सरकारी रुग्णालये आणि कोविड केंद्रांना पुरविण्यात येणार असून मागणीप्रमाणे पुरवठा वाढविण्याची तयारीही बीएआरसीने दाखवली आहे.

बीएआरसीच्या प्लांटसोबत खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलाझर्स (आरसीएफ) ने गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. तसेच बीपीसीएलच्या वतीनेही असाच प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून लवकरच दक्षिण-मध्य मुंबई ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येतून मुक्त होईल, असा विश्वास खासदार शेवाळे यांनी व्यक्त केला आहे.

देशातील कोविड 19 रुग्णांसाठीच्या उपचारार्थ लागणाऱ्या ऑक्सिजनची (Oxygen) टंचाई कमी करण्याच्या दृष्टीने , भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबईने (IIT Mumbai) निर्मितीक्षम आणि अभिनव उपाय शोधून काढला आहे. यशस्वी चाचणी झालेला हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प एका सामान्य तांत्रिक क्लुप्तीवर आधारित आहे. पीएसए (प्रेशर स्विंग एबसॉरप्शन) नायट्रोजन युनिटचे पीएसए ऑक्सिजन युनिट मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. आयआयटी मुंबईने घेतलेल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये याचे आशादायी परिणाम दिसून आले आहेत. 3.5 एटीएम इतक्या दाबाने 93% ते 96 % शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते. या ऑक्सिजन वायूचा उपयोग विद्यमान कोविड रुग्णालयांमध्ये तसेच येऊ घातलेल्या कोविड -19 विशेष सुविधा केंद्रांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठा करण्यासाठी कोविड उपचारासंबंधीत गरजा भागविण्यासाठी केला जाऊ शकतो.