Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

भारत देशात सध्या कोरोना व्हायरस संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारी यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठीच लॉकडाऊन जाहीर केले आहे. दरम्यान या परिस्थितीमध्ये 20 मार्चपासून मुंबई, नवी मुंबई परिसरात मद्यविक्रीची दुकानं बंद असल्याने अनेकांना हा होम क्वारंटाईनचा काळ घालवणं कठीण होत आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुंबईतील चेंबूर भागात राहणार्‍या एका जोडप्याने या लॉकडाऊनच्या काळात 24 मार्चला ऑनलाईन दारू खरेदीचा प्रयत्न केला असता त्यांना 1 लाखाचा फटका बसला आहे. या जोडप्याला ऑनलाईन वाईन शॉप खरेदीसाठीचा संपर्क क्रमांक मिळाला. त्यानंतर ऑनलाईन खरेदीच्या नादात त्यांना भुर्दंड बसला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऑनलाईन वाईन खरेदीसाठी सुरूवातीला जेव्हा फोनवरून संपर्क करण्यात आला तेव्हा संबंधित व्यक्तीने 3000 रूपये भरण्यास सांगितले. त्यानंतर एक OTP येईल असेही म्हणाले. मात्र ओटीपी शेअर केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून 30,000 रूपये गेले. पैसे परत मिळवण्याच्या नादात सहा वेळा त्यांनी ओटीपी शेअर केले आणि सुमारे 1.03 लाख या ऑनलाईन व्यवहारामध्ये गमावले. सध्या या प्रकाराची ऑनलाईन तक्रार टिळकनगर पोलिस स्थानकामध्ये करण्यात आली आहे.

खारघरमध्येही अशाच प्रकारे ऑनलाईन मद्यविक्रीच्या नादात 51,000 रूपये गमावल्याचं वृत्त समोर आलं आहे. डेबिट कार्डच्या माध्यमातून ग्राहक 1260 रूपयांचं बिल भरत होता. मात्र ऑनलाईन व्यवहारात त्याला 51,000 चा फटका बसला आहे. त्याचे अनेक इंस्टॉलमेंट या एका व्यवहारामध्ये गेले.

दरम्यान केरळमध्ये सरकार मद्यविक्रीची दुकानं सुरू करण्याचा विचार करत आहे. तर अभिनेते ऋषी कपूर यांनी देखील अशाचप्रकारे मागणी केली होती.