Coronavirus in Mumbai: मागील दोन महिन्यात मुंबईमध्ये 90 टक्के कोरोनाचे रुग्ण हे उंच इमारतीमधील रहिवासी; झोपडपट्टी आणि चाळींमध्ये आढळले फक्त 10 टक्के रुग्ण
Medical Workers (Photo Credits: IANS)

गेल्या 4 महिन्यांमध्ये कमी झालेल्या कोरोना विषाणूने (Coronavirus) आता काही दिवसांपासून पुन्हा डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात दररोज दहा हजाराच्या वर रुग्ण आढळत आहेत, तर मुंबईमध्ये (Mumbai) हा आकडा हजाराच्या वर आहे. अशाप्रकारे महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील कोरोनाची प्रकरणे पुन्हा गंभीर अवस्थेत पोहोचली आहेत. गेल्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये राजधानीत कोरोनाचे दोन प्रकार समोर आले, त्यातील 90 टक्के प्रकरणे ही उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांशी संबंधित आहेत. दुसरीकडे झोपडपट्टी आणि चाळींमधून केवळ 10 टक्के प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

शुक्रवारी बीएमसीने ही माहिती दिली. मात्र, अधिकाऱ्यांनी असेही म्हटले आहे की मार्चमध्ये परिस्थिती किंचित बदलली आहे आणि झोपडपट्ट्यांमधील रुग्णांची संख्याही वाढत आहे. बीएमसीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत संक्रमणाची एकूण 23,002 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी 90 टक्के लोक उच्च इमारतींमधील रहिवासी असून, 10 टक्के झोपडपट्टी व चाळीमधील रहिवासी होते. त्यानुसार या महिन्याच्या सुरूवातीपासूनच शहरातील कोरोना व्हायरस कंटेन्मेंट झोनमध्ये 170 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर सीलबंद इमारतींची संख्या 66 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. (हेही वाचा: Vasai-Virar: आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू)

बीएमसीच्या म्हणण्यानुसार 1 मार्च रोजी मुंबईत 10 कंटेन्मेंट झोन होते आणि 137 इमारती सील करण्यात आल्या होत्या. 10 मार्च रोजी कंटेन्मेंट झोनची संख्या 27 झाली आणि सीलबंद इमारतींची संख्या 228 वर गेली. गुरुवारपर्यंत मुंबईत कोरोना विषाणूच्या संसर्गाची एकूण 3,38,631 प्रकरणे नोंदवली गेली आहेत व मृत्यूंची संख्या 11,515 आहे. मुंबईमध्ये मोठ्या इमारत कॉम्प्लेक्समध्ये राहणारे लोक कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे अनुसरण करीत नाहीत असे दिसत आहे. कोरोना रूग्णांसाठी स्वतंत्र खोल्या व प्रसाधनगृहांची व्यवस्था नसल्यास त्यांना विभक्त केंद्रात हलविण्यात यावे, असा कडक इशारा पालिकेने दिला आहे.