देशभरात कोरोना लसीकरणाच्या (Coronavirus Vaccination) दुसऱ्या टप्प्याला 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. या टप्यात जेष्ठ नागरिकांसह अन्य गंभीर आजार जडलेल्या लोकांना लस दिली जात आहे. याचदरम्यान, आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा उन्हामुळे चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना वसई विरार महानगरपालिकेच्या (Vasai-Virar Municipal Corporation) नालासोपारा (Nalasopara) येथील आरोग्य केंद्रात आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. या आरोग्य केंद्रातसरुग्णवाहिका तसेच प्राथमिक उपचाराची सोय नसल्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
हरीशभाई पांचाळ (वय, 63) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हरिशभाई हे वसई-विरारच्या नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर परिसरातील रहिवाशी आहेत. हरिशभाऊ हे आज कोरोनाची लस घेण्यासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रात लसीकरणासाठी गेले होते. मात्र, लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांना चक्कर आली. ज्यामुळे ते जमीनीवर पडले. दरम्यान, त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात घेऊन गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले आहे. यासंदर्भात लोकसत्ताने वृत्त दिले आहे. हे देखील वाचा-MPSC- UPSC Coaching Classes Pune: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पुण्यातील परीक्षार्थींसाठी खूशखबर
महत्वाचे म्हणजे, लसीकरण केंद्रात केवळ डॉक्टरांना ने- आण करण्यासाठी एक रुग्णावाहिका उपलब्ध होती. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजनची कोणतीही सुविधा नव्हती. यामुळे रुग्णावाहिका चालकाने हरिशभाई यांना रुग्णालयात नेण्यात नकार दिला. मात्र, स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हरिशभाई यांना जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दुर्देवाने उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पांचाळ कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले आहे.