MPSC- UPSC Coaching Classes Pune: स्पर्धा परीक्षा देणाऱ्या पुण्यातील परीक्षार्थींसाठी खूशखबर!, संचारबंदी असताना 'ही' सुवीधा राहणार सुरु
Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

स्पर्धा परीक्षा (Competitive Exams) देणआऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कोरोना व्हायरस नियंत्रणासाठी पुण्यात संचारबंदी आणि अनेक निर्बंध असले तरी, MPSC- UPSC अथवा तत्सम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये कोचिंग क्लासेस (Coaching Classes) सुरु राहणार आहेत. अर्थात कोचिंग क्लासेस सुरु राहणार असले तरी त्यालाही नियम आणि अटींचे बंधण हे असणारच आहे. पुण्याचे आयुक्त सौरभ राव आणि महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी ही माहिती दिली आहे. सौरभ राव हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते तर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव नियंत्रणासाठी पुण्यात लॉकडाऊन नाही परंतू, संचारबंदी लागू करत निर्बंध कडक करण्यात आले आहेत. ही संचारबंदी रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कसे होणार, त्याचे कोचिंग क्लासेस सुरु राहणार की नाही? याबाबत अनेक प्रश्न होते. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'स्पर्धा परीक्षांसाठी कोचिंग क्लासेसला परवानगी ! स्पर्धा परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेसला परवानगी द्यावी, अशी सूचना आपण आजच्या पालकमंत्री अजितदादांच्या बैठकीत केली असता, ती सूचना मान्य करण्यात आली असून नियम पाळून ५० टक्के आसन क्षमतेत परवानगी देण्यात आली आहे.' (हेही वाचा, Pune Lockdown Latest News: पुण्यात रात्री 11 ते सकळी 6 पर्यंत संचारबंदी, लॉकडाऊन नाही; पाहा कोणते निर्बंध)

दरम्यान, MPSC परीक्षा 14 मार्चऐवजी 21 मार्चला म्हणजे रविवारी होणार आहे. पूर्वनियोजीत असलेली एमपीएससी पूर्व परीक्षा कोरोना पार्श्वभूमीवर अचानक पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली. त्यातून पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर अशा विविध शहरांमधून विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केले. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा उचलून धरला.

एमपीएससी परीक्षा तोंडावर आहे. त्यामुळे एमपीएससी विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी असलेल्या कोचिंग क्लासेसना सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. एमपीएससी परिक्षा (21 मार्च) होईपर्यंत संबंधिक कोचिंग क्लासेस सुरु राहतील. मात्र, इथेही 50 % क्षमतेने कोचिंग क्लासेस सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आल्याचे, पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी म्हटले आहे.