Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणू रुग्ण संख्येने पार केला 20 लाखाचा टप्पा; सध्या 45,622 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु
Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सध्या देशामध्ये कोरोन विषाणू (Coronavirus) लसीकरण मोहीम राबवली जात असून, पहिल्या टप्प्यात कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जात आहे. गेले एक वर्ष भारत या विषाणूशी लढत आहे व आता कुठे या व्हायरसपासून सुटका मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र (Maharashtra) हे सर्वाधिक प्रभावित राज्य होते. आता महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू रुग्ण संख्येने 20 लाखाचा टप्पा ओलांडला आहे. आज राज्यात 2,886 रुग्ण आढळून आले आहेत व 52 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह एकूण मृत्यूंची संख्या 50,634 झाली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात आज 2886 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 3980 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 19,03,408 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 45,622 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.13% झाले आहे.’ गेल्या काही महिन्यात राज्य सरकारने वेळोवेळी उपायोजना राबवल्याने सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. (हेही वाचा: कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेणार- गृहमंत्री अनिल देशमुख)

मात्र महाराष्ट्राने आता 20 लाख रुग्णांचा टप्पा पार केला आहे. जगातील सर्वात प्रभावित 10 व्या क्रमांकावरील देश जर्मनीमध्ये 2,094,671 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र काही संख्येनी जर्मनीच्या मागे आहे. दरम्यान, देशात नवीन रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. बुधवारी, 15,270 कोरोनाचे रुग्ण आढळले आणि 20,071 बरे झाले आहेत. आज 152 जणांना आपला जीव गमवावा लागला. यासह, 4,963 सक्रिय प्रकरणे कमी झाली आहे. सध्या देशात केवळ 1.89 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 24 जूननंतरचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.