कोरोना व्हायरस लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) काळात नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात आल्याची मोठी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनी केली आहे. कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 (IPC Section 188) अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडिओत गृहमंत्र्यांनी म्हटले की, "कोविड-19 लॉकडाऊन काळात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत जे गुन्हे दाखल करण्यात आले होते. ते गुन्हे राज्य शासनाच्या माध्यमातून मागे घेण्यात येत आहेत." (लॉकडाऊन काळात राज्यात कोविड-19 संदर्भात 1 लाख 23 हजार गुन्ह्यांची नोंद, तर 6 कोटी 54 लाख रुपयांचा दंड; गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती)
अनिल देशमुख ट्विट:
कोविड-19 च्या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार आहे. pic.twitter.com/UEVyzrUjHp
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 20, 2021
दरम्यान, कोविड-19 चा संसर्ग रोखण्यासाठी देशासह राज्यात 4 महिने कडक लॉकडाऊन होता. जून महिन्यापासून मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरु झाले. परंतु, लॉकडाऊन काळात सारं काही ठप्प असून नागरिकांवर कडक निर्बंध लादण्यात आले होते. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यांचे प्रमाण फार मोठे होते. विशेष म्हणजे गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींना दोषारोपपत्र दाखल करुन नोटीसही बजावण्यास सुरुवात झाली होती. मात्र राज्य सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयामुळे यातील सर्व आरोपींना दिलासा मिळाला आहे.