CM Uddhav Thackeray Appeals: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवाहनानंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी रद्द केले नियोजित दौरे
Sharad Pawar | (Photo Credits-Facebook)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम काही काळासाठी रद्द केले आहेत. राज्यात वाढणारी कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलेले अवाहन आदी पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या पाहून राज्य सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही गंभीर इशारा देत सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याचे आपल्या भाषणात म्हटले होते.

शरद पवार ट्विट

शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. (हेही वाचा, Sandeep Deshpande on Thackeray Government: अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? ठाकरे सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नाही म्हणून कोरोना आकडे वाढवून सांगण्यात येतायेत - संदीप देशपांडे)

सुप्रिया सुळे ट्विट

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी माझे २२ फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंतचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.नियोजित कार्यक्रमानुसार सोमवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मी पुणे येथील कार्यालयात भेटींसाठी उपलब्ध राहणार होते.

पुढच्या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात की, परंतु या भेटी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा दृढपणे मुकाबला करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. 'मी जबाबदार' नागरीक आहे, त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी मी आवश्यक ती काळजी घेईन हा निश्चय प्रत्येकाने करावा ही विनंती. (हेही वाचा, कोरोनाशी लढणार्‍या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे महाराष्ट्रातील जनतेला पत्र; केले 'हे' कळकळीचे आवाहन)

रोहित पवार ट्विट

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळावी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनानुसार उद्याचा सातारा दौरा स्थगित केला आहे. कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर या नियोजित सर्व ठिकाणी मी निश्चित भेट देईन!तूर्तास नियम पाळू, कोरोना टाळू!

दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 1 मार्चपासून सुरु होत आहे. असे असताना राज्यातील अर्धा डजनहून अधिक मंत्र्यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. त्यामुळे हे मंत्री जर क्वारंटाईन झाले तर अधिवेशन कसे पार पडणार याबाबत उत्सुकता आहे.