Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे निदान झाले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील कोविड 19 शी लढताना त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एक पत्र लिहून कोविड 19 (COVID 19) च्या गाईडलाईनचं तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं आवाहन केले आहे. महाराष्ट्राला अजून एक लॉकडाऊन (Lockdown) घेणं परवडणारे नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सार्‍यांनीच काळजी घेण्याचं त्यांनी आवाहन केले आहे. त्यामध्ये मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर तंतोतंत पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे आवाहन केले आहे.

दरम्यान मागील वर्षभरापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. आता कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. त्यामुळे पुन्हा सामुहिक लढाई लढण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'वर्षभरापासून कोरोना स्थिती नियंत्रणामध्ये ठेवण्याचा निर्णय घेत आहे. अशामध्ये हॉट्सस्पॉटला भेटी दिल्या पण कोरोना माझ्या जवळ येऊ शकला नाही पण अखेर त्याने मअला गाठलेच' असे राजेश टोपे यांनी नमूद करताना येत्या काही दिवसात या आजारावर मात करून पुन्हा कामावर रूजू होईन असं त्यांनी म्हटलं आहे.

राजेश टोपे यांचे पत्र इथे वाचा:

महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण पुन्हा झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिकांना 8 दिवसांचं अल्टिमेटम देण्यात आलं आहे. मास्क वापरा लॉकडाऊन टाळा असे देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.