भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या 165 च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात 49 जणांना या विषाणूची लागण झाली आहे. या व्हायरसमुळे देशात आज चौथा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून लोकांना एकटे राहण्यास सांगितले जात आहे. सरकारने अनेक ठिकाणी अनेक सेवा काही कालावधीकरिता बंद केल्या आहेत. अशात आता उद्या, 20 मार्च सकाळपासून कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) महानगरपालिकेच्या हद्दीतील जीवनावश्यक वस्तू, बेकरी, डेअरी, किराणा दुकाने, मेडीकल, रुग्णालय/क्लिनिक, भाजीपाला आदी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात, 13 मार्च पासून साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला. या अनुषंगाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्यानुसार नागरीकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने काही निर्णय घेतले आहेत. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून, महानगरपालिकेतील हद्दीतील जीवनावश्यक वस्तु, बेकरी, दुग्धजन्य दुकाने, किराणा दुकाने, मेडीकल स्टोअर्स, रुग्णालये, क्लिनिक, भाजीपाला इ. दुकाने सोडून अन्य सर्व व्यावसायिक आस्थापने व दुकाने 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
(हेही वाचा: दुबई, कुवैत, ओमानसारख्या देशांतून मुंबई येणार 26 हजार भारतीय; BMC ची चोख व्यवस्था, पवईमध्ये उभारले विलगीकरण केंद्र)
मुख्य म्हणजे या आदेशाचे उल्ल्ंघन झाल्यास, संबंधित दुकानदार, व्यवसायिक किंवा मालक भारतीय दंडसहिता कलम, 188 नुसार दंडनीय/कारयदेशीर कारवाईस पात्र ठरणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार रोकला जावा यासाठी ठाकरे सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली आहे, बेस्टच्या फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. अनेक रस्ते बंद ठेवले जाणार आहेत, वाहतूक कमी केली जाणार आहे. लोकांना जास्तीत जास्त घरी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.