
सध्या संपूर्ण देशाला कोरोना विषाणू (Corona Virus) संकटाने ग्रासले आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 166 च्या वर गेली आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त, 49 रुग्ण आढळून आले आहेत. एकीकडे सरकार यावर उपाय योजना करीत आहे, तर दुसरीकडे रुग्णांची योग्य ती व्यवस्था केली जात आहे. अशात आता मुंबई (Mumbai) मध्ये अखाती देशांतून (Gulf Countries) 26 हजार भारतीय दाखल होणार आहेत. यासाठी मुंबईची तयारी सुरु आहे. आजपासून 31 मार्चपर्यंत संयुक्त अरब अमिराती (युएई), कुवैत आणि ओमान सारख्या आखाती देशांमधून येणाऱ्या 26,000 लोकांच्या मुक्कामाच्या व्यवस्थेमध्ये मुंबई पालिका व्यस्त आहे.
बीएमसीच्या (BMC) म्हणण्यानुसार या देशांमधून दररोज 23 विमाने मुंबईला पोहचतील. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार युएई, कुवैत, कतार आणि ओमानहून येणाऱ्या सर्व प्रवाशांना 14 दिवस वेगळे ठेवणे बंधनकारक आहे व त्यांना मुंबईमध्ये ठेवले जाणार आहे. हा आदेश 18 मार्चपासून लागू झाला. दुबईहून आलेल्या महाराष्ट्रातील 15 जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाल्याने, बीएमसीने पवई येथे नव्याने बांधलेल्या प्रशिक्षण केंद्राला संशयित रुग्णांना वेगळे ठेवण्याचे केंद्र म्हणून रुपांतरीत केले आहे. याशिवाय मरोलमधील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन वॉर्डची व्यवस्था केली आहे.
पवई येथील विलगीकरण केंद्रामध्ये अनेक कॉन्फरन्स रूम आहेत, जिथे शंभरएक बेड ठेवण्यात आले आहेत आणि तेथे अजूनही बरीच जागा शिल्लक आहे. आखाती देशांतील बहुतेक भारतीय या महिन्याच्या अखेरीस भारतात दाखल होतील. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार यातील बहुतेक लोक मध्यपूर्वेतील देशांमध्ये मोठ्या पदांवर काम करत आहेत. या लोकांना अनेक प्रकारात विभागले जाईल, जसे की जे निरोगी असतील आणि ज्यांचे मुंबईत घर असेल त्यांना घरी जाण्याची परवानगी असेल. परंतु, त्यांना आपापल्या घरात इतरांपासून स्वतःहून वेगळे ठेवले जाईल. (हेही वाचा: सीबीएसईसह सर्व शैक्षणिक संस्थांच्या चालू परीक्षा 31 मार्चपर्यंत तहकूब; मानव संसाधन विकास मंत्रालयाचा आदेश)
Coronavirus : कोरोना रुग्णांच्या आकड्यात वाढ ;जाणून घ्या आतापर्यंत कोणत्या राज्यात किती रुग्ण : Watch Video
जे लोक पुणे, नाशिकसारख्या जवळपासच्या भागातील असतील आणि त्यांना संसर्ग होण्याची शक्यता खूप कमी असेल, त्यांनाही घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यांना प्रायव्हेट वाहनाने घरी पाठवले जाईल.