सरकार वगळता इतर कोणत्याही व्यक्ती, संस्थेला रेमडेसिवीर (Remdesivir) खरेदी करुन विक्री करण्याचा अधिकार नाही असे राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी म्हटले आहे. भारतीय जतना पक्षाकडून रेमडेसिवीर खरेदी करण्याच्या प्रकरणात मोठं राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपमधील काही लोक आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीर औषध खरेदी प्रकरणात भाजपकडून दावा करण्यात आला होता की, अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती. या आरोपाला उत्तर देताना राजेंद्र शिंगणे बोलत होते.
राज्यात रेमडेसिवीर औषधांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत होता. त्यामुळे रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयं शोधाशोध करत होती. अशात ब्रुक फार्मा नामक कंपनीकडे या औषधांचा मोठा साठा उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालक आणि अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले. ब्रुक फार्मा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावल्याचे समजताच राज्याचे विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांनी थेट पोलीस्टेशनला हजेरी लावली आणि पोलिसांची खरडपट्टी काढली. (हेही वाचा, Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता)
दरम्यान, रेमडेसीवीर औषध साठा आणि ती बनवणारी ब्रुक फार्मा कंपनी तसेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले विरोधी पक्ष नेते आदींवरु राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकारण रंगले. ब्रुक फार्माकडे असलेला साठा आम्ही राज्यासाठीच खरेदी करणार होतो, असे भाजप नेत्यांनी सांगितले. तसेच, रेमडेसीवीर इंजक्शन्स आम्हाला उपलब्ध होणार असल्याने सरकारच्या पोटात दुखत असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या सर्व प्रकरणात भाजपकडून राज्य सरकार आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यावर आरोप करण्यात येत होते. मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या परवानगीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा आरोपही भाजपाकडून करण्यात आला होता. या आरोपाला राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्युत्तर दिले.
Maharashtra | No party has the right to sell Remdesivir. Some people from BJP had approached me to buy it from their supplier. They're trying to defame me. Our department will take action against those involved in black marketing of Remdesivir: Rajendra Shingne, FDA Minister pic.twitter.com/hOabwO97Kd
— ANI (@ANI) April 20, 2021
राजेंद्र शिंगणे यांनी म्हटले आहे की, भाजपच्याकाही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसीवीर औषध खरेदी करावी असे म्हणत आमच्याशी संपर्क केला होता. परंतू, त्याही वेळी त्यांना सांगितले होते की, सरकारशिवाय इतर कोणालाही रेमडेसीवीर खरेदी करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कोणीही ते खासगी अथवा व्यक्तिगत पातळीवर खरेदी करु नये. हेच लोक आता मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतू, रेमडेसीवीर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाऊ शकेल असे शिंगणे यांनी सांगितले.