Lockdown in Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आजपासून  कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची शक्यता
Lockdown | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

अनेक निर्बंध घालूनही राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्यात आता अधिक कडक प्रमाणावर निर्बंध लावण्याची गरज सरकारमधील अनेक मंत्र्यांनी कालच्या (20 एप्रिल) मंत्रिमंडळ बैठकीत बोलून दाखवली. कोरोना व्हायरसची राज्यातील साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा झाली. या चर्चेवेळी राज्यात पुन्हा एकदा 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन (Lockdown in Maharashtra) लावण्यात यावा अशी चर्चा झाली. राज्य मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) राज्यातील लॉकडाऊनची आज (21 एप्रिल) घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज राज्यातील लॉकडाऊनबाबत आज घोषणा करतील असे संकेत दिले. राजेश टोपे यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (21 एप्रिल) रात्री आठ वाजलेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्याबाबत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रात्री आठ वाजता याबबत मार्गदर्शक तत्वे जाहीर करतील. दरम्यान, राज्यातील अत्यावश्यक सेवा मानल्या जाणाऱ्या दुकाने, रेल्वे, एसटी आणि स्थानिक परिवहन सेवा तसेच भाजीपाला, दूध या सेवा सुरुच राहतील. इतर घटकांवर मात्र निर्बंध कायम राहतील, असेही राजेश टोपे यांनी सांगितले आहे. (हेही वाचा, COVID 19 In Mumbai: बॉलिवूड कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स आता मुंबईत नाकेबंदीसाठी रस्त्यावर उतरलेल्या पोलिस कर्मचार्‍यांच्या दिमतीला)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहेकी, सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. राज्य सरकारांनी लॉकडाऊनकडे शेवटचा पर्याय म्हणून पाहावे. प्रत्येक नागरिकाने कोरोना व्हायरस नियमांचे पालन केले तर लॉकडाऊन लावण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोना लढाईत नियमांचे पालन करुन लढायला हवे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.