महाराष्ट्रामध्ये वॉर अगेन्स्ट वायरसची (War Against virus) लढाई पुन्हा जोर धरू लागली आहे. यामध्ये महाराष्ट्रात वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता आता कलम 144 लागू करण्यात आले आहे. मुंबईतही कडक संचारबंदीचं पालन व्हावं म्हणून पोलिसांनी जागोजागी नाकेबंदी केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कोणी रस्त्यावर उतरत नाही ना? हे तपासण्याचं काम देखील सध्या सुरू आहे. पण कडाक्याच्या उन्हात आणि कोरोना संकटाला दोन हात करत रस्त्यावर उभ्या असणार्या पोलिस कर्मचार्यांसाठी आता कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स मदतीला आल्या आहेत. सध्या चित्रीकरण बंद असल्याने कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स या मुंबई पोलिसांसाठी तैनात करण्यात आल्या आहेत. नक्की वाचा: आवश्यक सेवा पाससाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचे आवाहन.
मुंबई मध्ये नाकेबंदीच्या ठिकाणी दहिसर चेक नाका, मरोळ नाका, घाटकोपर आणि दिंडोशी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये हायवे वर कलाकारांच्या व्हॅनिटी व्हॅन्स या पोलिसांसाठी सज्ज असल्याचं पहायला मिळालं आहे. प्रामुख्याने या व्हॅनिटी वॅन्स महिला पोलिस कर्मचार्यांसाठी फारच सोयीच्या झाल्या आहे. महिलांना सहज वॉश रूम उपलब्ध नसतात त्यामुळे कपडे बदलण्यासाठी, शौचालयाला जाणं त्यांना अनेकदा कठीण होते पण या व्हॅनिटी व्हॅन्स आता त्यांना फायदेशीर आहेत.
मुंबई मध्ये सध्या वाढता कोरोना प्रभाव पाहता अनेक ठिकाणी निर्बंध घालण्यात आले आहेत. आजपासून ब्रेक द चेन अंतर्गत नियमांमध्ये वाढ करून लोकांना अनावश्यक गर्दी टाळण्याचं पुन्हा पुन्हा आवाहन करण्यात आलं आहे. सध्या राज्य सरकार ब्रेक द चेन च्या पुढे जाऊन काही काळ पूर्ण कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता नागरिकांनी बाहेर पडताना पूर्ण खबरदारी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
मागील वर्षी बॉलिवूड कलाकार सोनू सूद, रोहित शेट्टी यांनी पोलिसांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांना आपली हॉटेल्स वापरण्यासाठी खुली करून दिली होती तर अनेकांनी पोलिसांसाठी आर्थिक मदतीचा हातभार देखील उचलला होता.