Coronavirus: कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात ते तर केंद्र सरकारचे अपयश- शिवसेना खासदार संजय राऊत
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढ्यात केंद्र सरकार दुजाभाव करत आहे. ही घटना देशाला एकसंध ठेवणारी नाही. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्याच राज्यात कोरोना हाताळणीत केंद्रीय पथकाला त्रुटी आढळतात. शिवाय भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातच कोरोना व्हायरस संसर्ग अधिक असल्याचे चित्र उभा केले जात आहे, असे राऊत म्हणाले. शिवाय महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आशा भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना लस आणि औषधं योग्य प्रमाणात न पुरवणं हा अमानुषपणा असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.

महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना व्हायरस वाढतो आहे. ही राज्ये कोरोनाशी लढण्यात अपयशी ठरल्याचे केंद्रीय आरोग्य सचिव सांगतात. तसे असेल तर ते अपयश प्रथम केंद्र सरकारचे आहे. कोरोना व्हायरस विरुद्धची पूर्ण लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. त्यामुळे ही लढाई अपयशी ठरली तर ते केंद्राचं अपयश आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करुनच कोरोनाबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. असे असूनही केंद्रीय सचिव कोरोना लढाईत राज्ये अपयशी ठरल्याचे म्हटले जात असेल तर ते केंद्राचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Lockdown: टास्क फोर्सकडून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची मागणी, कॅबिनेटकडून 14 एप्रिल पर्यंत निर्णय जाहीर करण्याची शक्यता)

केंद्रीय सचिव हे ज्या राज्यांची नावे घेत आहेत त्या ठिकाणी बिगरभाजप सरकार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी भाजपचे सरकार तिथे कोरोना पळून गेला असे तंत्र या लोकांनी निर्माण केले आहे काय? असा सवालही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. कोरोना हे संकट आहे. अशा जगव्यापी संकटात सर्वांनी अत्यंत जबाबाजरीने आणि भान ठेऊन राहायला हवे. परंतू, तसे घडताना दिसत नाही. रेमडिसीवर या इंजेक्शनचा देशभरात तुटवडा असताना ती गुजरात भाजप कार्यालयात मिळत आहेत. हवी तेवढी मिळत आहे. म्हणजे ही औषधं एका राजकीय पक्षाच्या मुख्यालयातून ती मिळू शकतात. परंतू, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड राज्यांमध्ये रेमडिसीवर मिळत नाही, केंद्र सरकारची ही वागणूक अतिशय अमानुष असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.