महाराष्ट्रात (Maharashtra) आज आणखी कोरोना व्हायरस बाधित 552 नवे रुग्ण आढळले आहेत, यामुळे राज्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 5, 218 वर पोहचली आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्याबाबतीतही धोका वाढत आहे. याआधी सीएम उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान 'मातोश्री' जवळील चहा टपरीवाल्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. आता आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी, 'वर्षा' (Varsha) बंगल्यावर तैनात असलेल्या एका महिला पोलिस कॉन्स्टेबलची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
Police constable posted at Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray's official residence tests positive for #coronavirus: Official
— Press Trust of India (@PTI_News) April 21, 2020
यासोबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अधिकृत निवासस्थानी असलेल्या एका पुरुष हवालदाराचीही कोरोना व्हायरस चाचणी सकारात्मक आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईच्या बांद्रा येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी राहत असल्याने, त्यांचे दक्षिण मुंबईतील शासकीय निवास्थान 'वर्षा' बंगला सध्या रिकामाच आहे. या प्रकरणाबाबत माहिती देताना एका आयएएस अधिकाऱ्याने सांगितले की. 'एका महिला कॉन्स्टेबलची कोरोना विषाणू चाचणी सकारात्मक आली आहे. संपर्क ट्रेसिंग चालू असताना आम्ही तिला रुग्णालयात दाखल केले आहे.' (हेही वाचा: महाराष्ट्रात कोरोनामुळे आतापर्यंत 251 जणांचा मृत्यू; राज्यात आज 552 नव्या रुग्णांची नोंद तर, एकूण कोरोनाबाधीतांचा आकडा 5 हजार 218 वर)
तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 'सागर' येथे तैनात असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलचीही कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 12 एप्रिल रोजी त्याच्यामध्ये काही लक्षणे दिसली, त्यानंतर 14 एप्रिल रोजी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याचा चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. आम्ही त्या ठिकाणी तैनात असलेल्या इतर सर्व पोलिस अधिकाऱ्यांना काढून त्यांना वेगळे ठवले आहे.’