Nana Patole | (Photo Credits: twitter)

सध्या अयोध्येला (Ayodhya) जाण्यावरून महाराष्ट्राच्या राजकारण चांगलेच तापले आहे. प्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली. मात्र यूपीतील विरोधामुळे त्यांनी दौरा रद्द केला. आता महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी ते 7 जूनला अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे जाहीर केले आहे. नाना पटोले म्हणाले की, अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यां नी गेल्या आठवड्यात मुंबईतील काँग्रेस कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांना अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले होते.

पटोले यांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. हा राजकीय दौरा नसून ही तीर्थयात्रा आहे असेही त्यांनी सांगितले. शुक्रवारी नागपुरात पत्रकारांना संबोधित करताना पटोले म्हणाले की, काही मंत्र्यांसह राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यासोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील 15 जून रोजी अयोध्येत जाऊन इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. शुक्रवारी एका कार्यक्रमामध्ये संजय राऊत म्हणाले होते की, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते अयोध्येला जाणार आहेत. त्यामागे राजकारण नाही. हा आपल्या श्रद्धेचा विषय आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यापूर्वीही अयोध्येला गेले आहेत आणि भविष्यातही जातील. (हेही वाचा: Navneet Rana आणि Ravi Rana यांच्या अडचणीमध्ये वाढ, BMC ने पाठवली दुसरी नोटीस, 7 दिवसांत मागितले उत्तर)

याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार देखील कुटुंबासह अयोध्येला गेले होते. या भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यानंतर सर्वांचे लक्ष राज ठाकरेंच्या दौऱ्याकडे लागले होते. अयोध्या दौरा पुढे ढकलल्याबद्दल राज ठाकरे यांनी सांगितले होते की, 22 मे रोजी पुण्यातील मेळाव्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान, उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या तीव्र विरोधादरम्यान राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे.