Navneet Rana आणि Ravi Rana यांच्या अडचणीमध्ये वाढ, BMC ने पाठवली दुसरी नोटीस, 7 दिवसांत मागितले उत्तर
Navneet Rana, Ravi Rana | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती रवी राणा (MLA Ravi Rana) यांची संकटे कमी होण्याचे नाव घेत नाहीत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आता राणा दाम्पत्याला दुसरी नोटीस पाठवली आहे. मुंबईतील खार येथील त्यांच्या घराच्या बेकायदा बांधकामाबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीला काल संध्याकाळी राणा दाम्पत्याने बीएमसीच्या या नोटीसला उत्तर दिले आहे, मात्र, त्यांच्या उत्तराने बीएमसी समाधानी नाही. त्यामुळेच त्यांना दुसरी नोटीस पाठवण्यात आली आहे.

या नोटीसीला राणा दाम्पत्याला येत्या 7 दिवसांत उत्तर द्यावे लागणार आहे. राणा दाम्पत्याने दिलेल्या उत्तरावर बीएमसीचे समाधान झाले नाही, तर त्यांच्या घरातील बेकायदा बांधकाम पाडण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. राणा दाम्पत्याचा मुंबईतील खार भागात फ्लॅट आहे. ज्यामध्ये बीएमसीला बेकायदा बांधकाम केल्याचा संशय आहे. 4 मे रोजी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवनीत राणा यांच्या घराची पाहणी केली होती.

या तपासणीपूर्वी बीएमसीने राणा दाम्पत्याला नोटीसही पाठवली होती. मात्र, त्यावेळी नवनीत राणा यांच्या घरी कोणीही उपस्थित नव्हते. त्यानंतर बीएमसी पुन्हा त्यांच्या घरी चौकशीसाठी गेली. दुसरीकडे हनुमान चालीसा वादात मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला काही अटींसह जामीन मंजूर केला होता. ते या प्रकरणी माध्यमांशी बोलणार नाही, अशी अट प्रामुख्याने न्यायालयाने घातली होती. परंतु नवनीत राणा यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखतीही दिल्या. त्यानंतर आता त्यांच्या अडचणीत अजून वाढ होत आहे. (हेही वाचा: केतकी चितळे हिला अट्रॉसिटी प्रकरणात पाच दिवसांची पोलीस कोठडी, ठाणे कोर्टाचे आदेश)

नवनीत राणा आणि रवी राणा यांना 23 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यांच्या या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी दोघांविरुद्ध देशद्रोह आणि ‘वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष पसरवण्याच्या’ आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.