
अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिचा पाय दिवसेंदिवस अधिकच कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. तिच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली (Atrocities Act) आगोदरच दाखल असलेल्या आणिखी एका प्रकरणात तिला आता ठाणे सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामळे ठाणे मध्यवर्ती कारागृहात असलेल्या केतकी चितळे हिला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. तिला कोर्टासमोर हजर केले असता तिला पोलीस कोठडी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियात लिहिल्यानंतर केतकी चितळे हिला पोलीसंनी अटक केली. ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला होता. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्येही तिच्या विरोधात अनेक ठिकाणी दाखल झाले आहेत. शरद पवार पोस्ट प्रकरणी न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यानच, रबाळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, Objectionable Post About Sharad Pawar: अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीमध्ये वाढ; राज्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल)
केतकी चितळे हिच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही तिच्यावर अनेक ठिकाणी विविध कारणांमुळे गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. अट्रॉसिटीचा गुन्हाही त्यापैकीच एक. दरम्यान, केतकी चितळे हिने शरद पवार यांच्याबद्दल लिहिलेली आक्षेपार्ह पोस्ट कोणाकडूनत तरी आली होती असा संशय आहे. तिने आपल्या मोबाईलमधील SMS डिलीट केले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे हा संशय अधिक बळावला आहे. केतकी ही व्हॉट्सअॅप वापरत नाही. ती केवळ फेसबुक आणि एसएमएसच्या माध्यमातून सक्रिय असल्याचेही तपासात पुढे आले आहे.