महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Mahrashtra Vidhansabha Elections) आटोपून आठवडे उलटून गेले असले तरी अद्याप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची (Maharashtra CM) खुर्ची मात्र रिकामीच आहे. दोन दिवसांपूर्वीच आधीच्या विधानसभेचा कार्यकाळ संपल्याने तांत्रिक बाबींनुसार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा आपला राजीनामा दिला असून आता केवळ काळजीवाहू मुख्यमंत्री म्ह्णून ते कार्यरत आहेत. भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा हट्ट आणि रुसून बसलेला मित्रपक्ष शिवसेना यामुळे राजकीय वर्तुळात अस्थिरता निर्माण झाली आहे. अशातच निदान राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन सत्ता स्थापन करावी असेही पर्याय सुचवले जातायत या सल्ल्यांवर आज काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी प्रतिक्रिया देत, "महाराष्ट्रात राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची (Congress) सत्ता स्थापन होणे हे केवळ एक स्वप्न असल्याचे सांगितले आहे. या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा आवश्यक आहे पण या आधारासाठी शिवसेनेकडे जाणे काँग्रेससाठी अपायकारक ठरू शकते असेही निरुपम म्हणाले.
ANI या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, संजय निरुपम यांनी शिवसेनेशी हातमिळवणी करणे काँग्रेसच्या हिताचे नाही असे मत व्यक्त करत एका अर्थाने सत्ता स्थापनेचा हा पर्याय नाकारल्याचे स्पष्ट होत आहे.
पहा काय म्हणाले संजय निरुपम
Sanjay Nirupam, Congress on Maharashtra govt formation: Congress-NCP govt in Maharashtra is only an imagination. If we want to convert that imagination into reality, it won't be possible without Shiv Sena's support & if we take Shiv Sena's support, it will be fatal for Congress. pic.twitter.com/HrJhrv5JCY
— ANI (@ANI) November 10, 2019
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी चर्चा करण्यासाठी राजभवनावर आमंत्रित केले होते. तर शिवसेनेने अजूनही आपला मुख्यमंत्रीपदाचा हट्ट सोडलेला नाही. या चढाओढीत भाजपा आणि शिवसेना या मित्रपक्षांमधील राजकीय संघर्ष शिगेला पोहचला असताना शिवसेनेला महाआघाडी सोबत हात मिळवणी करण्याचा पर्याय देखील आता बंद होण्याची चिन्हे आहेत.