Maharashtra Government Formation: 'उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं' शिवसैनिकांची मातोश्री बाहेर पोस्टरबाजी; लवकरच राजकीय कोंडी फूटण्याची शक्यता
उद्धव ठाकरे| Photo Credits: Twitter

महाराष्ट्रात राजकीय कोंडी लवकरच फूटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महायुतीमध्ये तणावाचे संबंध असताना शिवसेना राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मदत घेऊन आता सत्ता स्थापनेचा दावा करू शकते. अशी स्थिती निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी काही शिवसैनिकांची भूमिका असून मुंबईत त्या आशयाची होर्डिंग्स झळकत आहेत. उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्या जवळ एक पोस्टर उभरण्यात आलं आहे. ज्यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा एका शिवसैनिकाने व्यक्त केली आहे. हे पोस्टर नेमकं कोणी लावलं याची माहिती नाही. भाजप-शिवसेना सरकार बनवत नसेल तर, काँग्रेस-राष्ट्रवादी पर्यायी सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्न करेल- नवाब मलिक.

दरम्यान राज्यपालांनी राज्यातील नंबर 1 चा पक्ष म्हणून भाजपाला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं आहे. परंतू भाजपा 145 आमदारांच्या सहीचं पत्र देऊ न शकल्यास शिवसेनेकडे सत्ता स्थापनेची संधी येणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाकडून त्यांचे आमदार फुटू नयेत, घोडे बाजार होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे. सध्या मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक आमदार वास्तव्यास आहेत. थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आमदारांसोबत चर्चा करणार आहेत.

ANI Tweet  

24 ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाला. शिवसेना - भाजपा एकत्र लढले असले तरीही समान सत्ता वाटपासाठी आग्रही असलेल्या शिवसेनेच्या मागण्या भाजपा कडून पूर्ण होत नसल्याने आता भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करू नये अशा प्रकारची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र बदलणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.