Maha Vikas Aghadi: काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत थिणगी पडण्याची शक्यता
Nana Patole (Photo Credits-ANI)

काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या असल्याने त्यांच्यावरी भार कमी करण्याच्या हेतूने प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या नेत्याकडे सोपवण्यात येणार आहे. याबाबत स्वत: बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तसे संकेतही दिले होते. दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. यातच नाना पटोले यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आता महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) थिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडीच्या चर्चेत नाना पटोले यांचे नाव आघाडीवर आहे. यासंदर्भात नाना पटोले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन प्रदेशाध्यक्षपद स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. नुकताच पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. दरम्यान, ते म्हणाले की, “आमच्या पक्षात जे काही संघटनात्मक निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. ते राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आहेत. पक्षाकडून आम्हाला जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडून पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी आणि पक्ष स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत कसा येईल? यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच महाराष्ट्राला पुन्हा वैभव मिळवून देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केले जाईल”, असे नाना पटोले म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Balasaheb Thackeray Birth Anniversary: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर; शरद पवार, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित

महाराष्ट्रात भाजपशी युती तोडल्यानंतर शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची हात मिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात विविध मुद्द्यावरून वाद सुरु आहे. यातच नाना पटोले यांच्या वक्तव्याने अधिक भर घातली आहे.