Balasaheb Thackeray 95th Birth Anniversary: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि बंधू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुन्हा एकदा एकाच व्यासपिठावर एकत्र येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. निमित्त आहे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena founder Balasaheb Thackeray ) यांच्या पुतळ्याच्या अनावरनाचे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंती (Balasaheb Thackeray 95th Birth Anniversary) निमित्त होणाऱ्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपिठावर येणार असल्याच समजते.
कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक सर्वपक्षीय बैठक काही महिन्यांपूर्वी (मे 2020) आयोजित केली होती. या बैठकीवेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. (हेही वाचा, मुंबई: कुलाबा परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळा अनावरणाचं महापौरांकडून राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण; स्थानिकांचा मात्र पुतळा उभारणीला विरोध)
मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत महापालिकेद्वारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 11 फुटी पुतळा उभारला जात आहे. मात्र, वाहतूक, दळनवळण आणि सुरक्षेचे कारण पुढे करत स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये दिलेल्या एका आदेशाचा दाखला देत स्थानिकांनी या पुतळ्यास विरोध केला आहे. परंतू, हा पुतळा उभारण्यास जवळपास सर्वपक्षीय मान्यता असल्याने स्थानिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष केले जाण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभारलेला हा बहुदा पहिलाच पुतळा असणार आहे. या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात नेहमीच तुलना केली जाते. राज ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांचे राजकीय वारस म्हणून पाहिले जात होते. परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी २००4 मध्ये आपला मुलगा उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी निवडले आणि त्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज ठाकरे यांनी मार्च 2005 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.