Balasaheb Thackeray | File Photo

मुंबई मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीचं औचित्य साधत यंदा 23 जानेवारी दिवशी कुलाबा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील (Dr Shyama Prasad Mukherjee Chowk) वाहतूक बेटामध्ये उभारण्यात येणार आहे. रविवारी हा पुतळा आणल्यानंतर स्थानिकांनी त्याच्या उभारणीला विरोध दर्शवला आहे. पण पालिका या पुतळा अनावरण सोहळ्यावर ठाम आहे. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना या सोहळ्याचं आमंत्रण त्यांनी स्वतः जाऊन दिले आहे.

दरम्यान 2013 सालच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पब्लिक रोड वर कोणतेही पुतळे उभारले जाऊ नयेत याचा दाखला देत काही रहिवाश्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळा उभारणीला आपला विरोध दर्शवला आहे. दरम्यान या पुतळ्यामुळे पादचार्‍यांची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. लोकांना सेल्फीचा मोह असल्याने इथे ट्राफिक जाम होऊ शकतो त्यामुळे राजकारणाचा भाग म्हणून नव्हे तर सुरक्षेच्या दृष्टीने हा विरोध असल्याची भावना निवृत्त वाईस अ‍ॅडमायरल आणि आपली मुंबई एनजीओचे अध्यक्ष आय सी राव यांनी TOI शी बोलताना दिली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव BMC स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्यानंतर तो महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात उभरला जाणार होता. मात्र जागा लहान असल्याने आता तो डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारला जाईल.

23 जानेवारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ चबुतरा सह 11 फूट उंचीचा आहे.