महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus) बाधित एकूण 10 रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण सापडले आहेत पण, त्यांच्यात तीव्र स्वरुपाची लक्षणे दिसत नाहीत. ज्या लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झालेली आहे त्या सर्वांची योग्य काळजी घेतली जात आहे. पुण्यात आतापर्यंत 8 रुग्णांना कोरोना व्हायरस (COVID 19) बाधा झाल्याची अधिकृत आकडेवारी, असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.
नागरिकांनी काळजी घ्यावी
या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नागरिकांनी घाबरुन जाण्याचे कारण नाही पण दक्षता घेण्याची गरज आहे. मुंबईत कोरोना व्हायरस बाधित 2 रुग्ण आढळले आहेत. परदेशातून विमानतळावर येत असलेल्या नागरिकांचीही तपासणी योग्य पद्धतीने केली जात आहे. कोरोना विषाणूची लक्षणे ही 14 दिवस दिसतात. योग्य काळजी घेतली तर त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यामुळे विदेशातून आलेल्या प्रवाशांनी किंवा कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो कुटंबातील इतर सदस्यांचा संपर्क टाळावा. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तींनी काही दिवस दिवस कुटुंबातील सदस्यांपासून वेगळे राहायला हरकत नाही.
गरज असेल तरच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
शाळा, कॉलेजना सुट्टी द्यावी का अशी विचारणा केली जात आहे. पण, सध्या तरी हा निर्णय घेण्यात येत नाही. दोन दिवस बारकाईने निरिक्षण करुन आवश्यकता वाटली तरच त्याबाबत निर्णय घेतला जात आहे. राज्य विधिमंडळ अधिवशनाबाबतही असाच निर्णय घेण्यात येत आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशन कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर गुंडाळले जाणार नाही. तर, कामकाज आटोपशीर करुन ते पूर्ण केले जाईल, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, मुंबई शहरात 2 जणांना कोरोना व्हायरस, महाराष्ट्रातील COVID-19 रुग्णांची संख्या 7 वर)
लोकप्रतिनिधींनी वॉर्डावॉर्डात जावे
कोरोना व्हायरसबाबत जागृती करण्यासाठी सर्व आमदार, खासदार आणि इतर मंडळींनी वॉर्डावॉर्डात जाण्याची आवश्यकता आहे. तसेच, नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे. नागरिकांनी कारण नसताना गर्दीत जाऊ नये, कारण नसताना हात, डोळे, नाक आदींना हात लाऊ नका.
दरम्यान, आयपीएल बाबत सांगायचे तर आम्ही प्रेक्षकांविना आयपीएल सामने भरवू शकतो, असे आयोजकांचे म्हणने असल्याचे समजते. मात्र, आयोजकांकडून अधिकृतपणे आम्हाला त्याबाबत काहीही माहिती आली नाही. त्यामुळे त्याबाबत आद्याप निर्णय नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.