कोरोना विषाणूच्या (Coronavirus) महामारीमुळे महाराष्ट्रामध्ये सध्या लॉकडाऊनसह अनेक निर्बंध लागू आहेत. हे निर्बंध 1 जूनपर्यंत लागू असतील असे प्रशासनाने सांगितले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात राज्यात नुकतेच आलेल्या तौक्ते वादळाची परिस्थिती व त्याबाबत राज्याने केलेल्या मदतीबाबत माहिती देऊन केली. केंद्र सरकार नैसर्गिक आपत्तीमध्ये राज्य सरकारला मदत करते. मात्र अशा नैसर्गिक आपत्ती वरचेवर येत असल्याने केंद्राने मदतीबाबतचे निकष बदलण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच अशा आपत्तींबाबत अनेक ठिकाणी काही वेगळी व्यवस्था करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी कोरोना काळामध्ये सरकारने केलेल्या मदतीबाबत भाष्य केले. यामध्ये धान्याचे मोफत वितरण, शिवभोजन थाळी, दिव्यांग-वृद्ध-विधवा यांच्यासाठीच्या योजना, बांधकाम कामगारांना निधी, घरेलू कामगारांना निधी, फेरीवाल्यांसाठी निधी, आदिवासी लोकांसाठी निधी दिल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले, राज्यात लॉकडाऊन किंवा निर्बंध लागू करणे मला अजिबात योग्य वाटत नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये हे करणे गरजेचे आहे. यावेळी मुखमंत्र्यांनी मागच्या वर्षीची रुग्णसंख्या व सध्याची रुग्णसंख्या यांची तुलना करीत, अजूनही धोका टळला नसल्याचे सांगितले. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून मृत्यूदर कमी झाल्याचे सांगितले.
पुढे महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत असल्याने ती एक काळजीची गोष्ट असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी राज्यातील आरोग्य सेवेबाबत माहिती दिली. सध्या राज्यामध्ये ऑक्सिजन पुरवठा, औषधे, रुग्णालये, बेड्सची संख्या वाढवण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ‘सध्या विषाणू त्याची रूपे बदलत आहे. तो वेळोवेळी नवीन रूप धारण करत आहे जी चिंतेची बाब आहे. या विषाणूशी लढण्यासाठी आपल्याला तयार राहायला पाहिजे. राज्यावर कोरोनाचे सावट असताना म्युकरमायकोसीसचे संकट उद्भवले आहे. त्याच्याशीही दोन हात करणे गरजेचे आहे.’
त्यानंतर त्यांनी राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘माझा डॉक्टर’ संकल्पनेबाबत माहिती दिली. या संकल्पनेमुळे रुग्णांना लवकरात लवकर मदत मिळून, त्यांची रुग्णालयात जाण्याची शक्यता कमी होणार आहे. यामध्ये कोविड किंवा नॉन कोविड रुग्ण ओळखणे, रुग्णांना कोणती औषधे, इंजेक्शन द्यायची, कोणत्या रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज आहे व कोणते रुग्ण घरी बरे होऊ शकतात याबाबत निर्णय घेणे अशा गोष्टींचा समावेश आहे.
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लसीकरणाबाबत माहिती दिली. 18-44 वयोगटातील लोकांना लस देण्याची जबाबदारी राज्याची आहे. राज्य यासाठी समर्थ असल्याचे ते म्हणाले. जूनपासून राज्यात लसीचा पुरवठा वाढेल व लवकरच पुन्हा लसीकरण मोहीमेला वेग येईल असे ते म्हणाले.
त्यानंतर त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ‘12 वीच्या परीक्षांवर भविष्यातील अनेक गोष्टी अवलंबून असतात. यासाठी केंद्राने एक धोरण निश्चित करणे गरजेचे आहे व हे धोरण सर्व राज्यांसाठी एकसमान असणे गरजेचे आहे. 10 वीच्या परीक्षांबाबत आम्ही निर्णय घेतला मात्र 12 वीच्या परीक्षांबाबत केंद्राने राज्यांना मार्गदर्शन करावे.’ (हेही वाचा: Nagpur: खासगी रुग्णालयाचा खोटारडेपणा उघड, 92 Covid-19 रुग्णांना द्यावे लागणार 10 लाख रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण)
पुढे त्यांनी, जनतेला आवाहन केले प्रत्येकाने आपले घर, वाड्या-वस्त्या, गाव, तालुका, जिल्हा कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी कोरोना मुक्त गाव मोहीम राबवावी. ते पुढे म्हणाले की, ‘कोरोनाची ही दुसरी लाट अपेक्षेपेक्षा मोठी होती. यामध्ये अनेकजणांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले आहे. यामध्ये ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे त्यांना राज्य सरकार साथ देईल. सरकार अशा बालकांसाठी एक नवी योजना घेऊन येणार आहे.’
शेवटी त्यांनी सांगितले. सध्या राज्यातील लॉकडाऊन 15 दिवसांसाठी वाढवला आहे. 1 जूननंतर राज्यातील जिल्ह्यांनुसार निर्बंध कमी जास्त केले जातील. कोरोनाची तिसरी लाट येऊ न देण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत.