कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार, 13 सप्टेंबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यात कोविड-19 ची परिस्थिती हाताळण्यासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' (My Family, My Responsibility) अभियानाची सुरुवात 15 सप्टेंबर पासून होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती, मराठा आरक्षण याबद्दलही त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. दरम्यान, सणासुदीच्या काळात नागरिकांनी दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नागरिकांचे आभार मानले.
मिशन बिगेन अगेन अंतर्गत मॉल्स, कार्यालये, दुकाने यासंदर्भातील नियम हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या वाढत असणारे कोरोना बाधितांचे आकडे बोलके आहेत, असंही ते म्हणाले. डिसेंबर, जानेवारी पर्यंत लस हातात येईल अशी आशाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन काळात कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्याबरोबच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करण्याचे काम करण्यात आले, हे देखील मुख्यमंत्र्यांनी आर्वजून सांगितले.
माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान:
महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. या 12 कोटी जनतेची आरोग्य तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अभियानाअंतर्गत टीमद्वारे प्रत्येक कुटुंबाची चौकशी केली जाईल. लोकप्रतिनिधींना आपल्या वार्डची जबाबदारी घेतल्यास काम काहीसे सोपे होईल. त्यामुळे आरोग्य चौकशी करण्याची जबाबदारी नगरसेवक, आमदार, खासदार या सर्वांनी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कोरोना संकटात स्वतःची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना पुढीलप्रमाणे:
# हात धुवा.
# मास्क घालवा.
# ऑनलाईन खरेदीवर भर द्या.
# दुकानातील वस्तूंच्या सॅपल्सला कारण नसताना हात लावू नये.
# सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना अधिक बोलू नका.
# लक्षणे आढळल्यास तुमच्या संपर्कात आलेल्यांची माहिती टास्क फोर्सला द्या.
# हॉटेलमध्ये जेवताना समोरासमोर बसू नका.
# बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरसिंगवर अधिक भर द्या.
सूचना कटाक्षाने पाळल्या तर पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी:
2 लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या तब्बल 29 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी विक्रमी कापूस खरेदी केली, असे सांगत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिला.
साडेसहा लाख कुपोषित, आदिवासी बालकांना वर्षभर मोफत दूधभुकटी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सव्वालाख गर्भवती, स्तनदा मातांसाठीही दुधभुकटी मोफत देण्यात येईल. कोविड-19 संकटात शिवभोजन थाळी 5 रुपये करण्यात आली. तसंच जवळपास पावणे दोन कोटी थाळ्यांचे वाटप या काळात करण्यात आले. दरम्यान निसर्ग चक्रीवादळात सातशे कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षण:
सरकार मराठा समाजाच्या बाजूने असल्याने मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरुन आंदोलनं करु नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य सरकार तुमची बाजू न्यायालयासमोर मांडते आहे. तुमच्या सूचनांचा गांभीर्याने विचार करुन सरकार त्यातून मार्ग काढत आहे. तुम्हाला न्याय मिळून देणं आमचं कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे या परिस्थितीमध्ये गैरसमज पसरुन एकजुटीला तडा जाईल, असे वर्तन करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.
कोरोना व्हायरस संकटात आता नागरिकांनीही जबाबदारी उचलण्याची वेळ आली आहे. एकजुटीने आपण कोरोना संकटात नक्कीच निर्णायक विजय मिळवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यावर सर्वच बाजूने टीका होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावर मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला काढून एकदा बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.